शिवसेनेत विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; गोगावले, आबिटकर, राठोड यांच्यावर मोठी जबाबदारी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
शिवसेनेने राज्यभरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. या निर्णयात तीन कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक आमदार आणि वरिष्ठ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण विभागीय संपर्कप्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रदीप खाडे यांची सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी आमदार दगडू सकपाळ यांच्यावर विभागीय संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, हनुमंत जगदाळे यांची सह संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
दक्षिण कोकण विभागासाठी आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. मराठवाडा विभागाची जबाबदारी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी माजी मंत्री दीपक सावंत यांची विभागीय संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पराग पिंगळे यांची सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्याचे पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या नियुक्त्यांमुळे राज्यातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.




