मुंबईच्या घरकोंडीवर ‘क्लस्टर ते तिसरी मुंबई’ मॉडेल; ३० लाख घरांमधून शहराचा चेहरामोहरा बदलणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
मुंबईतील वाढती घरांची गरज, रखडलेला पुनर्विकास आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण यावर केवळ जुन्या मुंबईत बांधकाम करण्याऐवजी ‘क्लस्टर ते तिसरी मुंबई’ असा व्यापक विकासाचा दृष्टिकोन राज्य सरकारने स्वीकारला आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशात पुढील २० वर्षांत ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या माध्यमातून मुंबईचा भविष्यातील चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दै. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर’ कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना शिंदे यांनी मुंबईच्या घरांच्या प्रश्नाकडे केवळ गृहनिर्माणाचा विषय म्हणून न पाहता शहराच्या नियोजनबद्ध विस्ताराशी जोडण्याची भूमिका मांडली.
“कामाला स्थगिती नाही, तर कामाला गती” हे सरकारचे धोरण असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, UDCPR आणि समूह विकास योजना यामुळे रखडलेल्या व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला मोठी चालना मिळाली आहे. क्लस्टर पुनर्विकासात केवळ नवीन इमारती उभारल्या जाणार नाहीत, तर मोकळ्या जागा, डिजिटल लायब्ररी, कम्युनिटी हॉल, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महिला सक्षमीकरण केंद्रांसह नागरिकांसाठी २३ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मुंबईत सध्या सुमारे १० लाख घरांची आवश्यकता असून, एसआरएमार्फत ६ लाख तर म्हाडा आणि अन्य प्रकल्पांमधून ४ लाख घरे उभारण्याचे नियोजन आहे. त्याचवेळी ठाणे, मीरा-भायंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर आणि भिवंडी या MMR परिसरात आणखी २० लाख घरे उभारली जाणार आहेत. २०४७ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण आराखड्याचा पुढचा टप्पा म्हणजे ‘तिसरी मुंबई’ असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले. नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू, जेएनपीए आणि समृद्धी महामार्गाशी जोडलेल्या परिसरात पुढील ५० वर्षांचा विचार करून आधुनिक शहरी केंद्र विकसित केले जाणार आहे. एरोसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एज्युसिटी आणि आयटी-फिनटेक हबच्या माध्यमातून रोजगार, उद्योग आणि निवास यांचे एकत्रित केंद्र उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोसह आधुनिक वाहतूक व्यवस्था, लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांवरही भर दिला जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
घरांच्या प्रश्नावर पुनर्विकास आणि शहराच्या विस्ताराची सांगड घालत ‘क्लस्टर ते तिसरी मुंबई’ हे मॉडेल प्रत्यक्षात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यातून मुंबई महानगर प्रदेशाचे पुढील अनेक दशकांचे शहरी चित्र बदलण्याचा दावा शिंदे यांनी केला.
……




