ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
राजकीय तह की रणनीती? रायगडमध्ये गोगावले–तटकरे संघर्षाचा पहिला अंक संपला
अनिकेत तटकरे विधान परिषदेत, भरत गोगावले पालकमंत्रीपदी; आता पुढची स्वारी कोणाची? दुसरा अंक अधिक धगधगता ठरणार?

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
इतिहास साक्षी आहे… जेव्हा एखादा राजा संकटात अडकायचा, तेव्हा तो शत्रूसोबत तह करायचा. तो तह मैत्रीचा नसून नाईलाजाचा असायचा. शत्रूच्या अटी मान्य कराव्या लागायच्या, काही गमवावं लागायचं; पण तो राजा कधीच पराभूत होत नसे. योग्य वेळ येताच तो पुन्हा तलवार पाजवून युद्धभूमीत पुन्हा उभा राहायचा. तहात गमावलेलं सर्व परत हिसकावून घेण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी आणि गमिनीकाव्याने शत्रूवर तुटून पडायचा आणि तहामध्ये गमावलेलं पुन्हा युद्धाने तो सर्व जिंकायचा.
रायगडच्या राजकारणात आज तशाच इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेत बिनविरोध पोहोचवणे ही खासदार सुनील तटकरे यांची सर्वात मोठे राजकीय मोहीम होती. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा तीव्र विरोध असतानाही तटकरे यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आणि अखेर अनिकेत यांचा आमदारकीने राज्याभिषेक झाला.
राजकीय वर्तुळात उघड चर्चा अशी आहे की, या बिनविरोध विजयाच्या बदल्यात रायगडच्या पालकमंत्रीपदावरील राष्ट्रवादीचा दावा मागे घेण्याचा अलिखित तह झाला. या घटनेचा कोणताही अधिकृत पुरावा नाही, स्वाक्षरी नाही; पण घडलेल्या घटनांची साखळी अनेक प्रश्न निर्माण करते एवढं मात्र निश्चित आहे.
दीड वर्षांपूर्वी आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून घोषणा होताच रायगड पेटला होता. महाडमध्ये रस्तारोको, टायर जाळणे आणि शिवसैनिकांचा संताप यामुळे सरकारला निर्णय स्थगित करावा लागला. तेव्हापासून भरत गोगावलेंचा दावा कायम होता. अनिकेत तटकरे हे आमदार झाल्यानंतर शिवसेना सातत्याने तटकरे यांना तहाची आठवण करून देत होती.
विशेषतः आमदार महेंद्र दळवी यांची आक्रमक भूमिका ही योगायोग नव्हती, असे बोलले जाते. “शब्द दिला असेल तर पाळा,” हा दबाव सातत्याने वाढत गेला आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निर्णय घ्यावाच लागला. मंत्री भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले.
हा निर्णय म्हणजे केवळ एका मंत्र्याची नियुक्ती नव्हती; हा रायगडच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या रिमोट कंट्रोलचा ताबा आहे. पालकमंत्रीपद म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा निधी, विकासकामांचे प्राधान्यक्रम, प्रशासकीय समन्वय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव. त्यामुळे हे पद गमावणे हा राष्ट्रवादीसाठी केवळ राजकीय नव्हे तर प्रशासकीय धक्का मानला जात आहे.
दक्षिण रायगड हा खासदार सुनील तटकरे यांचा अभेद्य राजकीय गड मानला जातो. श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव आणि महाडच्या पट्ट्यात राष्ट्रवादीचे संघटन आजही मजबूत आहे,(अपवाद फक्त भरत गोगावले महाडमध्ये आमदार आहेत.) तर शिवसेना (शिंदे) आणि भाजपला त्या भागात अपेक्षित जनाधार उभा करता आलेला नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्रीपद तटकरे गटाकडे गेले असते, तर दक्षिणेतील वर्चस्वाच्या बळावर उत्तर रायगड जिंकण्याची मोहीम सुरू झाली असती. हाच धोका ओळखून तटकरे यांच्या वाढत्या प्रभावावर लगाम घालण्यासाठी भरत गोगावले यांच्या हाती पालकमंत्रीपदाची तलवार देण्यात आल्याची जोरदार राजकीय चर्चा आहे.
मात्र गोगावले यांच्या हातात सत्ता आली म्हणजे दक्षिण रायगड जिंकला, असा अर्थ अजिबात होत नाही. पालकमंत्रीपदाने अधिकार मिळतात; जनाधार मिळत नाही. तटकरे यांनी दोन दशकांत उभारलेले संघटन एका सरकारी आदेशाने कोसळणार नाही. उलट आता दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक धारदार होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
या संपूर्ण पटावर भाजपची भूमिका सर्वाधिक कूटनीतिक असल्याचे बोलले जाते. शिंदे गट आणि तटकरे गट एकमेकांशी झुंजत राहिले, तर दोघांचीही राजकीय ऊर्जा परस्परांवर खर्च होईल; आणि त्याच वेळी भाजप स्वतःला रायगडमध्ये स्थिर, संयमी आणि पर्याय म्हणून उभे करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा संघर्ष दोन पक्षांचा असला, तरी सर्वाधिक राजकीय फायदा तिसऱ्याच पक्षाला भाजपाला होऊ शकतो.
रायगडच्या जिल्हा नियोजन समितीचा कोट्यवधी रुपयांचा निधी, विकासकामांचे प्राधान्यक्रम, रस्ते, पर्यटन, सिंचन आणि पायाभूत सुविधा या सर्वांचा रिमोट आता पालकमंत्र्यांच्या हातात गेला आहे. उद्या निधीची दिशा बदलली, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांकडे विकासाची गंगा वळली, तर तो केवळ प्रशासकीय निर्णय नसेल, तो रायगडच्या पुढील निवडणुकांचा राजकीय आराखडा असेल आणि नेमकं हेच तटकरे गटाचं सर्वात मोठं दुखणं ठरू शकतं.
तटकरे यांच्याकडून राजकीय हल्ला होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. याची पूर्ण जाणीव शिंदे गटातील भरत गोगावले, महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनाही असावी. त्यामुळे हा राजकीय हल्ला ते किती आक्रमकपणे आणि कोणत्या गनिमी रणनीतीने परतवून लावतात, यावर रायगडच्या सत्तासमीकरणाचा पुढचा अध्याय ठरणार आहे.
तटकरे हे पराभव स्वीकारणारे राजकारणी नाहीत, अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पुत्राला विधान परिषदेत पोहोचवलं; पण बदल्यात पालकमंत्रीपद गमावलं. इतिहासातील राजांसारखे तेही योग्य वेळेची वाट पाहत आहेत का? तह संपला… आता प्रतिहल्ल्याची व्यूहरचना सुरू झाली आहे का? नजीकच्या कालावधीत रायगडचा पुढचा राजकीय रणसंग्राम याच प्रश्नाचं उत्तर देणार असल्याने तूर्तास आपण थोडी वाट पाहूया.
…….




