ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सिव्हिल हॉस्पिटलवर राजकीय ‘मालकी’ कोणाची? चित्रलेखा पाटलांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल

15 कोटींचा खर्च, 51 टक्के पदे रिक्त; वीज ऑडिटपासून धोकादायक इमारतीपर्यंत प्रश्नांची सरबत्ती


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग

आंदोलन हा शेकापचा स्वभाव आणि जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे हीच पक्षाची ओळख. सत्तेत कमी आणि विरोधात अधिक राहिलेल्या शेकापने पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयावर धडक देत प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. पाटील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली; मात्र प्रमुख अधिकारी जागेवर उपस्थित नसल्याने सर्व प्रश्न उपस्थित कर्मचाऱ्यांनाच विचारावे लागले. त्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसतील तर रुग्णालयाचा कारभार नेमका कोण चालवतो, असा सवाल उपस्थित झाला.

रुग्णालयाचे विद्युत ऑडिटच झाले नसल्याची माहिती समोर आल्याने पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि अन्य अत्यावश्यक उपकरणे विजेवर अवलंबून असताना विद्युत सुरक्षेची तपासणीच होत नसेल, तर रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला. अमरावतीतील दुर्घटनेनंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच धोके दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रायगड सिव्हिलमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. 2024 मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या आणि त्यात जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. त्यानंतर जून 2026 मध्ये रुग्णालयाचा स्लॅब कोसळला. तरीही सुरक्षेच्या उपाययोजनांचा ठोस हिशोब समोर का आला नाही, असा सवाल पाटील यांनी केला.

15 कोटी खर्च; 99 पदे रिक्त

गेल्या 13 वर्षांत जिल्हा रुग्णालयावर जवळपास 15 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. एवढा खर्च होऊनही मूलभूत सुरक्षा प्रश्न कायम असल्याने या निधीचा हिशोब जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, रुग्णालयातील 194 मंजूर पदांपैकी तब्बल 99 पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची 42 पैकी 26, तर अधिपरिचारिकांची 96 पैकी 41 पदे रिक्त आहेत. सिस्टर ट्यूटर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, शुश्रुषा अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य तसेच लिपिक संवर्गातील पदेही रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडत आहे.

“निधी मंजूर झाला की श्रेय घेणारे अनेक; मात्र दुर्घटना झाली तर जबाबदारी कोणाची?” असा थेट सवाल करत पाटील यांनी संपूर्ण विद्युत व सुरक्षा ऑडिट करून त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली.

रुग्णालयाला केवळ निधी आणि विकासकामांची घोषणा नको, तर सुरक्षित इमारत, पुरेसे मनुष्यबळ आणि सक्षम सुरक्षा व्यवस्था हवी. त्यामुळे रायगडच्या सिव्हिलची जबाबदारी नेमकी कोणाची? हा सवाल आता राजकीयदृष्ट्याही ऐरणीवर आला आहे.

याप्रसंगी शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल पाटील, अलिबाग नगर परिषदेचे सभापती अनिल चोपडा, नगरसेविका अश्विनी ठोसर, नागेश्वरी हेमाडे, सागर पेरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

…..


Related Articles

Back to top button