ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“स्मार्ट सहकार”च्या दिशेने रायगडची झेप; AI आणि डिजिटल मॉडेलची राज्यभर चर्चा – रायगड जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीचा महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्तांकडून गौरव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग 
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पारंपरिक सहकार व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत “स्मार्ट सहकार”च्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, बँकेच्या आर्थिक प्रगतीसह डिजिटल उपक्रमांची आता राज्यस्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
पुणे येथील वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट (VAMNICOM) येथे राज्य शासन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त सभेमध्ये राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेने ठेवींमध्ये तब्बल २६ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. याबद्दल गौरव करताना सहकार आयुक्त दीपक तावरे म्हणाले,
“रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही प्रगती राज्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून बँकेच्या व्यवस्थापनाने केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे.”
यावेळी बँकेने नव्याने विकसित केलेल्या पिक कर्जवाटपातील डिजिटल प्रणालीचाही विशेष उल्लेख करण्यात आला. या डिजिटल प्रणालीमुळे कर्जवाटप प्रक्रियेत अधिक गतिमानता निर्माण होणार असून भविष्यात माहिती अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की,
“ही बाब संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राकरिता अभिमानास्पद असून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये आरडीसीसी बँकेचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.”
सहकार क्षेत्र अधिक तंत्रज्ञानस्नेही आणि सक्षम करण्यासाठी आगामी काळात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गृहनिर्माण सहकारी संस्था, पतसंस्था, अर्बन बँका तसेच विविध सहकारी संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रशिक्षणांत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डिजिटल बँकिंग, वित्तीय व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि आधुनिक सहकार व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये अधिक समन्वय निर्माण होऊन संपूर्ण सहकार व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, बँकेने मार्च २०२६ अखेर ७१०५.३३ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय नोंदविला होता. त्यामध्ये सातत्यपूर्ण वाढ होत एप्रिल २०२६ अखेर हा व्यवसाय ७३९१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नियोजनबद्ध कामगिरीच्या जोरावर चालू आर्थिक वर्षात ८५०० कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे.
बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भविष्यातील दृष्टी स्पष्ट करताना सांगितले की, “मार्च २०२८ अखेर बँक १० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करून ऐतिहासिक यश संपादन करेल. सहकार क्षेत्रातील बँकेचे योगदान हे केवळ रायगडपुरते मर्यादित न राहता राज्यातील सहकारी संस्थांसाठी आदर्शवत ठरेल.”
या बैठकीस नाबार्डचे जनरल मॅनेजर प्रदीप पराते, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक तसेच राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button