ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

शेतकऱ्यांची मुक्ती की अदानीसाठी जमीनमुक्ती?

११ हजार हेक्टर वनजमिनींच्या निर्णयामागे शेतकऱ्यांचा न्याय की लाखो कोटींच्या जमीन अर्थकारणाचा नवा खेळ?


फडशा 
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई
रायगडमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष वनजमिनींचा नाही. तो लाखो कोटींच्या जमीन अर्थकारणाचा आहे. वर्षानुवर्षे वन कायद्याच्या नावाखाली गोठलेल्या जमिनी, साठेखताद्वारे हात बदललेली मालकी आणि आता उद्योगांसाठी खुला होत असलेला मार्ग… या सगळ्या घटनांची साखळी एकत्र जोडली, तर एक धक्कादायक वास्तव समोर येते. ते म्हणजे सरकारी मोहर लावून रायगडमध्ये उद्योजकांसाठी जमिनींची लूट करणे.
राज्य सरकारने ११ हजार हेक्टर कांदळवनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि वनजमिनीवरील शिक्के हटवण्यासाठी नवा कायदा आणण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय वरकरणी शेतकऱ्यांच्या न्यायाचा वाटत असला, तरी अलिबागमधील अवघ्या ७० हजार चौरस फूट जमिनीच्या व्यवहाराशी त्याचा काही संबंध आहे का? शेतकऱ्याला सातबारा मिळणार, की लाखो कोटींच्या भविष्यातील नफ्यासाठी उद्योगांना जमीनमुक्तीचे रेड कार्पेट अंथरल जाणार हेच मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
रायगडच्या किनारपट्टीत अनेक वनजमिनी वर्षानुवर्षे साठेखतावर फिरल्या. मूळ शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेत जमिनींचे हक्क अर्धवट व्यवहारातून दिले. आज त्या जमिनींचा प्रत्यक्ष ताबा अनेक ठिकाणी मूळ मालकांकडे नसल्याची चर्चा आहे.
अशा वेळी वनाचा शिक्का हटवला तर मालकीचा आणि व्यवहाराचा सर्वात मोठा लाभ कोणाला मिळणार? गरीब शेतकऱ्याला, की साठेखताच्या आधारे जमीन ताब्यात घेऊन पुढे उद्योगांना विकणाऱ्या मध्यस्थांना?
अलिबागमध्ये अदानी समूहासाठी सिमेंट प्रकल्पाच्या अनुषंगाने ७० हजार चौरस फूट जमिनीचा प्रश्न चर्चेत आला आहे. क्षेत्रफळाने हा तुकडा मोठा आहे; पण तो संपूर्ण प्रकल्पासाठी प्रवेशद्वार, जोडरस्ता किंवा महत्त्वाचा दुवा असेल, तर त्याचे मूल्य कोट्यवधींच्या पुढे जाऊ शकते. म्हणूनच प्रश्न जमिनीच्या आकाराचा नाही; सरकारी निर्णयाच्या अचूक टायमिंगचा  आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य लाभाचा आहे.
११ हजार हेक्टर जमीन कांदळवनाखाली गेल्याने हजारो शेतकरी वर्षानुवर्षे अडकले. त्यावेळी भरपाई नव्हती, पर्यायी धोरण नव्हते, न्याय नव्हता. मग अचानक आजच नवीन कायदा आणण्याची गरज का निर्माण झाली? योगायोग असा की याच काळात अलिबाग परिसरात मोठ्या उद्योगासाठी जमिनींच्या हालचाली वेगाने सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे नागरिकांचा संशय स्वाभाविक ठरतो.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबागमध्ये महसूल विभागाची विशेष बैठक घेतली होती. अधिकृत अजेंडा होता प्रलंबित जमीन प्रश्न सोडवणे. पण आता वनजमिनी, कांदळवन आणि उद्योगासाठी जमीन या तीन घटना एकाच रेषेत दिसू लागल्याने त्या बैठकीकडे नव्या नजरेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते.
यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, मूळ शेतकऱ्यांकडून साठेखत करून जमिनी ताब्यात घेतल्यानंतर काही प्रभावशाली राजकीय पुढाऱ्यांचा हात असल्याची जोरदार चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. त्यामुळे वनजमिनी मुक्त करण्याच्या निर्णयामागे प्रशासन आणि राज्य सरकारची भूमिका नेमकी किती निष्पक्ष आहे, यावर थेट संशयाची सुरुवात झाली असून संपूर्ण साठेखत साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
सरकारने एकच गोष्ट करावी…
जर निर्णय पूर्णपणे शेतकरीहिताचा असेल, तर सरकारने खालील माहिती जाहीर करावी :
११ हजार हेक्टरपैकी किती जमीन मूळ शेतकऱ्यांच्या नावावर आहे?
किती जमिनींचे साठेखत झाले आहे?
७० हजार चौरस फूट जमिनीचा अंतिम लाभार्थी कोण?
या निर्णयामुळे कोणत्या खासगी कंपन्यांना व्यवहार सुलभ होणार आहेत?
अलिबागच्या शहापूर धरण परिसरात सध्या एका एकराचा बाजारभाव ८० लाख ते १.०९ कोटी इतका असल्याची चर्चा आहे. याच भागातील अनेक जमिनी पूर्वी साठेखताद्वारे ताब्यात घेतल्या गेल्याचा आरोप होत असताना, आता त्या जमिनी अदानीसारख्या उद्योगसमूहाला बाजारभावाच्या अनेक पटीने विकल्या जाणार असल्याच्या चर्चेने संशय अधिक गडद झाला आहे. जर हे वास्तव असेल, तर सर्वाधिक फायदा मूळ शेतकऱ्याला नव्हे तर साठेखताच्या आधारे जमीन ताब्यात घेऊन बसलेल्या मध्यस्थांना होणार; आणि ज्याने जमीन गमावली तो शेतकरी शेवटी ना जमिनीचा मालक राहील, ना कोट्यवधींच्या व्यवहाराचा भागीदार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सरकार स्वतःच्या आकडेवारीत ११ हजार हेक्टर कांदळवनाखाली गेलेल्या जमिनींची कबुली देते. याच जमिनींचा अलिबाग–शहापूर परिसरातील सध्याच्या बाजारभावावर आणि कथित चारपट दराने विचार केला, तर हा आकडा थेट ८७ हजार कोटी ते १.०९ लाख कोटींच्या घरात पोहोचतो. मग हा प्रश्न केवळ वनजमिनींचा राहत नाही, तर रायगडच्या कोट्यवधींच्या नव्हे तर लाखो कोटींच्या जमीन अर्थकारणाचा बनतो. म्हणूनच सरकारने श्वेतपत्रिका मांडून याचे उत्तर देणे गरजेचे नाही का? या निर्णयाचा सर्वात मोठा लाभ शेतकऱ्याला होणार आहे की मध्यस्थ आणि उद्योगसमूहांना? (वरील ८७ हजार कोटी ते १.०९ लाख कोटी हा आकडा सरकारी अधिकृत व्यवहारमूल्य नाही. तो ११ हजार हेक्टर क्षेत्रफळ × स्थानिक बाजारभाव × कथित चारपट दर या सूत्रावर आधारित एक संभाव्य आर्थिक अंदाज आहे. त्यामुळे हा आकडा अंतिम किंमत सिद्ध करत नाही; उलट एवढ्या प्रचंड आर्थिक हितसंबंधांचा संशय निर्माण होतो.)
जर एखादी कंपनी आज कोट्यवधी रुपये मोजून जमिनी खरेदी करत असेल, तर ती केवळ जमीन विकत घेत नाही; ती भविष्यातील हजारो कोटींच्या नफ्याची गुंतवणूक करत असते. त्यामुळे खरा प्रश्न जमिनीच्या किमतीचा नाही, तर त्या जमिनीतून उद्या निर्माण होणाऱ्या प्रचंड आर्थिक फायद्याचा आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचे अश्रू आहेत; पण पडद्यामागे जर ७० हजार स्क्वेअर फुट जमिनीसाठी कायदे बदलत असतील, तर हा इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार ठरू शकतो. याचसाठी रायगडमधील जनतेला याचे उत्तर पाहिजे आहे. शेतकऱ्यांची मुक्ती, की अदानीसाठी जमीनमुक्ती?
……

Related Articles

Back to top button