१० हजार कोटींचे लक्ष्य नव्हे… रायगडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय; जिल्हा बँकेची ८१७५ कोटींवरून मोठी झेप
१२.५% लाभांश जाहीर; नेट एनपीए शून्य, डिजिटल पीककर्ज, 'कृषीमित्र' योजनेतून आधुनिक शेतीला चालना, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही केवळ वार्षिक आर्थिक अहवाल मांडणारी सभा ठरली नाही, तर रायगडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नव्या पर्वाची दिशा ठरवणारी सभा ठरली. तब्बल ८१७५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केल्यानंतर आता १० हजार कोटी व्यवसाय आणि १००० कोटी स्वनिधी गाठण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प बँकेने जाहीर केला. याचबरोबर सभासदांना १२.५ टक्के लाभांश जाहीर करत बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकार, शेती आणि तंत्रज्ञान यांच्या संगमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
अलिबाग येथील बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या या सभेला संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जयंत पाटील यांनी बँक आता केवळ कर्जपुरवठा करणारी संस्था न राहता आधुनिक आणि उत्पन्नवाढीच्या शेतीला प्रोत्साहन देणारी विकासाची भागीदार बनत असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी बँकेच्या वतीने ‘कृषीमित्र’ योजना सुरू करण्यात आली असून पडीक जमिनीवर बांबू लागवड तसेच ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी केवळ ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. रोहा येथील प्रगतशील शेतकरी हर्षद साळवी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीत केलेल्या यशस्वी प्रयोगाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

रायगड बँकेने सहकार क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होण्याचा मान मिळविल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाइन आणि बायोमेट्रिक पद्धतीने पीककर्ज वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून, ७/१२ उताऱ्याची ऑनलाइन पडताळणी करून पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह कर्ज प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामगिरीचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखत ९३.३७ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या व्यवसायात २७ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असून, या यशाचे श्रेय ग्राहक, सभासद आणि सहकार संस्थांनी दाखविलेल्या विश्वासाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेत कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांनी १००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या संस्थापक, पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पहिले फ्लाईंग ऑफिसर कौस्तुभ मेहूल पाटील, आदर्श शिक्षक राजेश रामचंद्र भोईर, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू योगेश पेणकर, प्रगतशील शेतकरी मनोहर दत्तात्रेय पाटील, मंदार पाटील, हर्षद साळवी, शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारी, कृषिभूषण दिलीप भाऊ शिंदे, आरसीएफ एक्स एम्प्लॉयी सोशल फोरम आणि पर्यावरण संवर्धन संस्था ग्रीन अलिबाग यांचा समावेश होता. बँकेच्या ठेववाढीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संचालक संतोष पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

अहवाल वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पेझारी, पाच्छापूर, कोप्रोली, वरंध, नेरळ आणि गोसावीबुवा या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचाही गौरव करण्यात आला. तसेच ३६ वर्षे प्रामाणिक सेवा बजावणारे अधिकारी महेंद्र माळी आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवीन पनवेल शाखेच्या शाखाधिकारी निशा घरत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता केवळ आर्थिक व्यवहार करणारी बँक राहिलेली नाही; तर डिजिटल सहकार, आधुनिक शेती, पारदर्शक कर्जव्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी विकासाची प्रभावी आर्थिक संस्था म्हणून पुढे वाटचाल करत आहे. १० हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष्य ही केवळ आकड्यांची शर्यत नसून, रायगडच्या ग्रामीण विकासाचा नवा आर्थिक अध्याय ठरणार असल्याचा विश्वास या सभेत व्यक्त करण्यात आला.




