ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

आई-वडिलांच्या कष्टांच्या ‘ग्राउंड कंट्रोल’ला श्रावणीच्या अंतराळ स्वप्नाचे पंख; चंद्र-ताऱ्यांकडे पाहणारी रायगडची लेक आता एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या वाटेवर

पालकांच्या विश्वासातून घडली अंतराळाची स्वप्नपूर्ती; आयआयईएसटी शिबपूरमध्ये प्रवेश, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याचे ध्येय


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

अंतराळात झेपावणाऱ्या प्रत्येक रॉकेटमागे असते एक अदृश्य पण अत्यंत महत्त्वाची शक्ती… ती म्हणजे मिशन कंट्रोल रूम! रॉकेटच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारे शास्त्रज्ञ, अभियंते आणि तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे अंतराळ मोहिमा यशस्वी होतात. तसाच एका मुलीच्या आयुष्याच्या ‘मिशन’मागेही तिच्या आई-वडिलांचा त्याग, विश्वास आणि संस्कारांचे मजबूत ‘ग्राउंड कंट्रोल’ उभे राहिले. या भक्कम आधारावर अलिबाग तालुक्यातील चौल-पंतनगरची लेक श्रावणी रिना अमर थळे हिने आता आपल्या स्वप्नांच्या आकाशात भरारी घेतली आहे.

लहानपणी आकाशात चमकणाऱ्या चंद्र, तारे आणि ग्रहांकडे केवळ कुतूहलाने पाहणाऱ्या या चिमुकल्या मुलीने तेव्हाच मनाशी एक स्वप्न बांधले होते, “एक दिवस मला याच अंतराळ क्षेत्रात काम करायचे आहे.” त्या स्वप्नाला अभ्यासाची शिस्त, कठोर मेहनत आणि आई-वडिलांच्या सततच्या पाठिंब्याची जोड मिळत गेली. आज त्याच स्वप्नाने वास्तवाचे रूप घेतले असून, श्रावणीने देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIEST), शिबपूर येथे एरोस्पेस इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवत अंतराळ क्षेत्राकडे पहिले महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

श्रावणीचा हा प्रवास केवळ गुण, प्रवेश आणि यशाची आकडेवारी सांगणारा नाही, तर एका कुटुंबाने मुलीच्या स्वप्नावर ठेवलेल्या विश्वासाची आणि एका विद्यार्थिनीने आपल्या कुतूहलाला ध्येयामध्ये बदलण्याची प्रेरणादायी कहाणी आहे. भविष्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करून देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देण्याचे श्रावणीचे ध्येय आहे.

देशातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थांपैकी एक असलेल्या आयआयईएसटी शिबपूरमध्ये प्रवेश मिळवणे ही श्रावणीच्या मेहनतीची मोठी पावती मानली जात आहे. १८५६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला भारत सरकारने ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा’ दर्जा दिला आहे. एरोस्पेस, अभियांत्रिकी आणि संशोधन क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या संस्थेतून आता श्रावणी आपल्या अंतराळ प्रवासाची नवी सुरुवात करणार आहे.

श्रावणीने २०२४ मध्ये पनवेल येथील सी.के.टी. विद्यालयातून दहावीची परीक्षा ९८.८० टक्के गुणांनी उत्तीर्ण होत संपूर्ण रायगड जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर बारावीमध्येही तिने चांगली कामगिरी केली. जेईई ॲडव्हान्समध्ये यश मिळवत तिने आयआयईएसटी शिबपूरमधील एरोस्पेस इंजिनिअरिंगची संधी मिळवली.
अभ्यासातील गुणवत्ता जपत असतानाच श्रावणीने आपल्या कलागुणांनाही जोपासले आहे. भरतनाट्यममध्ये ती पारंगत असून पुणे विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती आहे. विज्ञान, कला आणि संस्कार यांचा सुंदर समतोल साधत तिने हे यश संपादन केले आहे.

लहानपणापासूनच श्रावणीला आकाशातील ग्रह, तारे, अंतराळ मोहिमा आणि विज्ञान विषयाबद्दल विशेष आकर्षण होते. इतर मुलांसाठी आकाशातील तारे केवळ चमकणारे बिंदू असतील, मात्र श्रावणीसाठी ते संशोधनाची नवी दालने उघडणारे विश्व होते. या कुतूहलातूनच तिने एरोस्पेस क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. आज शिबपूरमध्ये मिळालेला प्रवेश म्हणजे तिच्या त्या बालपणीच्या स्वप्नाचा पहिला टप्पा आहे.

श्रावणी मूळची अलिबाग तालुक्यातील चौल -पंतनगरची आहे. वडील अमर थळे यांच्या नोकरीनिमित्त पनवेल येथे स्थायिक झाले. तिच्या शिक्षणासाठी आई रिना थळे आणि वडील अमर थळे यांनी घेतलेल्या मेहनतीचा मोठा वाटा तिच्या यशामध्ये आहे. आजोबा राम थळे आणि आजी तिलोत्तमा थळे यांचेही तिला सातत्याने मार्गदर्शन लाभले.
“माझ्यासाठी आई-पप्पांनी घेतलेल्या कष्टांचे सार्थक करून दाखवायचे आहे,” ही भावना श्रावणीच्या मनात असून, भविष्यात मोठी वैज्ञानिक होऊन देशासाठी योगदान देण्याचा तिचा निर्धार आहे.
……


Related Articles

Back to top button