ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
नाकावर टिच्चून सत्तेत एन्ट्री; रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी राजकीय विजय की घाट्याचा सौदा?
सर्वाधिक २१ जागा जिंकूनही महिनाभर सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न; पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर अखेर सत्तासमीकरणात बदल

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना शिंदे गटाला तब्बल महिनाभर सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. “आम्ही दोघेच सत्ता स्थापन करणार” अशी अघोषित वल्गना करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून अखेर शिवसेना शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. मात्र या सहभागानंतरही सध्याच्या सत्तासमीकरणात शिवसेनेच्या हाती ठोस काहीच लागले नसल्याचे चित्र आहे. कारण पहिल्या सव्वा ते दीड वर्षांपर्यंत अध्यक्षपद मिळाले नाही. पुढे ते मिळेल याचीही खात्री नसल्याने हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी राजकीय विजय की घाट्याचा सौदा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. सोशल मीडियावरती भाजप आणि राष्ट्रवादी वर टीका करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना (शिंदे गट) यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा राजकीय डाव रचला गेल्याची चर्चा निवडणुकीनंतर सुरू झाली होती. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने तब्बल २१ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने १६, भाजपने १५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने ५ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. आकडेवारी स्पष्ट असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या समीकरणातून शिवसेना शिंदे गटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय संशयाला उधाण आले होते.
विशेष म्हणजे राज्यात महायुतीच्या नावाखाली भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र सत्तेत असताना रायगडमध्ये मात्र वेगळेच राजकारण सुरू असल्याचे दिसत होते. निवडणूकपूर्व युतीत शिवसेना शिंदे गटाचा समावेश नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या वेळी या पक्षाला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा होती.
या संपूर्ण राजकीय समीकरणामागे स्थानिक पातळीवरील वैयक्तिक राजकीय संघर्षही कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वी केलेली जहरी टीका आणि राजकीय संघर्ष हा या सत्तानाट्यामागील प्रमुख मुद्दा असल्याची चर्चा होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला, अशीही चर्चा रंगली.
दुसरीकडे राज्यातील काही भागात वाढत चाललेली शिवसेनेची ताकद ही भाजपासाठीही राजकीय आव्हान ठरत असल्याने जिथे शक्य आहे तिथे शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या रोखण्याचा अलिखित अजेंडा राबवला गेला, अशीही कुजबुज ऐकू येत होती. त्यामुळे रायगडमधील सत्ता स्थापनेचे राजकारण हे केवळ आकड्यांचे नव्हे, तर अहंकार, सूड आणि राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचे मैदान बनले होते.
सत्ता स्थापनेदरम्यान घोडेबाजार टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नवनिर्वाचित सदस्यांसह शिवसेना (उद्धव गट) आणि काँग्रेसच्या सदस्यांनाही सुरक्षित स्थळी ठेवले होते. गोवा पर्यटनाच्या नावाखाली काही दिवस सदस्यांना बाहेर ठेवण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या आदल्या दिवशी सर्व सदस्यांना अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे मुक्कामी ठेवण्यात आले होते, तर प्रमुख नेत्यांचा मुक्काम हॉटेल ताज येथे असल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, ११ मार्च रोजी अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण चित्रच बदलून गेले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याचा आदेश आल्याने दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाची चांगलीच गोची झाली. अखेर परिस्थितीपुढे माघार घेत शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सामावून घेणे भाग पडले.

सत्तेचा फॉर्म्युला ठरवताना अखेर तडजोडीचा मार्ग स्वीकारावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला भाजप, त्यानंतर शिवसेना शिंदे गट, पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना शिंदे गट अशा पद्धतीने सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे.
दरम्यान सत्ता स्थापन होणार या विश्वासात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना अलिबागमध्ये पाचारण केले होते. त्यांच्या उपस्थितीत अलिबाग समुद्रकिनारी “सुशासन संकल्प सभा” आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सत्ता स्थापनेनंतर थेट मिरवणुकीतून सभास्थळी जाण्याचाही कार्यक्रम आखला गेला होता. मात्र शेवटच्या क्षणी बदललेल्या राजकीय घडामोडींमुळे ही सभा रद्द करण्याची नामुष्की या दोन्ही पक्षांवर ओढवली.

या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतरही महायुतीतील अंतर्गत मतभेद संपलेले नसल्याचे संकेत मिळत आहेत. सोशल मीडियावर “आजचा काळा दिवस” अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तर “शादी में अब्दुल्ला दिवाना” किंवा “लगीन हाय लोकांचं, नाचतय येड्या ×××” अशा उपरोधिक पोस्टही व्हायरल होत आहेत.
एकूणच पाहता रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत अखेर शिवसेना शिंदे गटाने राजकीय चातुर्य दाखवत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे धुळीस मिळवले, अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. आता या अस्थिर समीकरणावर उभी असलेली सत्ता किती काळ टिकते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
…..
पुढील लेखांमध्ये वाचा शिवसेनेच्या हातात नक्की काय मिळाले…. सत्ता की धतुरा!




