ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
“थोरवे-तटकरे एकाच फ्रेममध्ये; राजकारण की सोयीचे समीकरण? जनतेला उत्तर देणार कोण ?”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
कालपर्यंत सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका करणारे आणि त्यांच्याविरोधात राजकीय रणशिंग फुंकणारे महेंद्र थोरवे आज अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावेळी त्यांच्यासोबत दिसतात. या फोटोमध्ये खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे हे देखील उपस्थित आहेत. हा केवळ एक फोटो नसून मतदारांच्या स्मरणशक्तीची आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेची क्रूर चेष्टा असल्याचे म्हणावे लागेल.
जर कालचे आरोप खरे होते, तर आजची जवळीक का? आणि आजची जवळीक योग्य असेल, तर कालचा संघर्ष कशासाठी? या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी नेत्यांवर आहे. अन्यथा कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे जपलेली भूमिका, केलेला संघर्ष आणि दाखवलेली निष्ठा ही केवळ राजकीय सोयीसाठी वापरलेली साधने होती, अशी भावना जनतेत निर्माण होणे अपरिहार्य ठरेल. राजकारणात मतभेद संपणे चुकीचे नाही, पण भूमिका बदलताना प्रामाणिक स्पष्टीकरण देणे ही लोकशाहीतील किमान नैतिक अपेक्षा आहे. ती नैतिकता आज राहिले नसल्याचे या कृतीतून दिसून येते. नाहीतर अशा छायाचित्रांमधून एकच संदेश जातो. वाद हे कार्यकर्त्यांसाठी असतात, तर व्यवहार हे नेत्यांसाठी.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली, एकेरी भाषेत उल्लेख केला आणि ज्यांच्याविरोधात तटकरेंनी कोट्यवधी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला, त्याच महेंद्र थोरवे यांचा अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपस्थित असलेला फोटो पाहून अनेक मतदारांच्या मनात संभ्रम आणि नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण राजकारणात मतदार आणि कार्यकर्ते हे नेत्यांच्या सार्वजनिक भूमिकांवर विश्वास ठेवून त्यांच्यामागे उभे राहत असतात. विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नेते अचानक त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण वातावरणात दिसू लागले की, कालच्या आरोपांचे आणि संघर्षाचे नेमके सत्य काय होते, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो.
राजकीय आघाड्या आणि समीकरणे बदलणे ही लोकशाहीतील सामान्य बाब असली तरी त्यामागे स्पष्ट राजकीय भूमिका किंवा वैचारिक कारणे असणे अपेक्षित असते. मात्र कालपर्यंत एकमेकांवर गंभीर आरोप करणारे नेते आज कोणतेही स्पष्टीकरण न देता एकत्र दिसत असतील, तर मतदारांना आपण फक्त नेत्यांच्या हातातले बाहुले आहोत का, अशी भावना निर्माण होते. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवून विरोधकांविरोधात संघर्ष केला, प्रचार केला आणि वैचारिक निष्ठा जपली. त्यामुळे अशा प्रसंगांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविक आहे.
यातून एक व्यापक प्रश्नही निर्माण होतो की, राजकारणात विचारसरणी, तत्त्वे आणि कार्यकर्त्यांचे समर्पण यांना खरोखर किती महत्त्व उरले आहे? कारण अनेकदा नेते राजकीय स्वार्थ, सत्तेची गणिते आणि तात्कालिक फायद्यासाठी पूर्वीच्या भूमिका बाजूला ठेवताना दिसतात. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांना असे वाटू लागते की, त्यांनी जपलेली वैचारिक निष्ठा आणि पक्षावरील प्रेम यापेक्षा राजकीय सोय अधिक महत्त्वाची ठरत आहे. म्हणूनच अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्जावेळी आमदार महेंद्र थोरवे एकत्र दिसलेल्या छायाचित्राकडे अनेकजण केवळ राजकीय शिष्टाचार म्हणून नव्हे, तर मतदारांच्या भावनांना आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेला गृहीत धरणाऱ्या राजकीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून पाहू शकतात.
…..


