ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

विरोधकांचा थयथयाट, निर्णय मात्र शक्तिकेंद्रांचा; अनिकेत तटकरे उमेदवारीमागील खरे राजकारण काय?

विधान परिषद रणांगणातील ‘स्मितहास्याचे राजकारण’ – फोटो काय सांगतो?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
अलिबाग |
महायुतीतील काही नेत्यांनी विरोधाचा झेंडा उंचावला, अपक्ष उमेदवारीचे अस्त्र बाहेर काढले, राजकीय दबावाचे सर्व प्रयोग करून पाहिले; मात्र अंतिम निर्णय घेणाऱ्या शक्तिकेंद्रांमध्ये तटकरे अजूनही स्वीकारार्ह आहेत, हेच अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद उमेदवारीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत समोर आलेले छायाचित्र आणि त्यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा आत्मविश्वास पाहता, रायगडातील विरोधापेक्षा मुंबईतील निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यास उघड विरोध दर्शवला होता. इतकेच नव्हे तर दळवी यांच्या कन्या जुईली दळवी -जुईकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून हा विरोध केवळ राजकीय वक्तव्यापुरता मर्यादित नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे रायगडच्या राजकारणात तटकरे यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र उभे करण्यात आले.
मात्र राजकारणात अंतिम निर्णय हा अनेकदा स्थानिक पातळीवरील गदारोळावर होत नाही. तो सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या नेतृत्वाच्या विश्वासावर होत असतो. याच ठिकाणी खासदार सुनील तटकरे पर्यायाने अनिकेत तटकरे यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो हा केवळ औपचारिक भेटीचा फोटो मानला जात नाही. त्या छायाचित्रात शिंदे यांनी अनिकेत तटकरे यांच्या खांद्यावर ठेवलेला हात, अनिकेत यांचा आत्मविश्वासपूर्ण चेहरा आणि बाजूला उभे असलेले खासदार सुनील तटकरे यांचे मिश्किल स्मित याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. छायाचित्रावरून कोणतेही ठोस निष्कर्ष काढणे योग्य नसले तरी राजकीय संकेतांच्या भाषेत हे दृश्य बरेच काही सांगून जाते.
विशेष म्हणजे उमेदवारीबाबतचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच ‘सत्यमेव जयते न्यूज’च्या ‘फडशा’ मालिकेत अनिकेत तटकरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे विश्लेषण प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी त्याकडे राजकीय अंदाज म्हणून पाहिले; मात्र आता घडामोडींचा वेग पाहता ते विश्लेषण वास्तवाच्या अधिक जवळ असल्याचे दिसून येत आहे.
महायुतीच्या अंतर्गत सूत्रांनुसार भाजप ११, शिवसेना (शिंदे) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये तटकरे गटाचा प्रभाव दुर्लक्षित करणे कोणत्याही नेतृत्वाला शक्य नव्हते. रायगड, कोकण आणि पक्ष संघटनेतील त्यांची ताकद हे देखील निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक ठरल्याचे बोलले जात आहे.
यामुळेच आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, जर विरोध इतका तीव्र होता तर तो अंतिम निर्णयापर्यंत प्रभावी का ठरला नाही? विरोधकांची ताकद कमी पडली की निर्णय घेणाऱ्या शक्तिकेंद्रांनी वेगळे राजकीय गणित मांडले? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील.
सध्या मात्र एक गोष्ट निर्विवादपणे दिसत आहे. रायगडमध्ये विरोधाचा आवाज कितीही मोठा असला तरी मुंबईतील सत्ताकेंद्रांमध्ये तटकरे यांचा प्रभाव कायम आहे. विधान परिषद उमेदवारीच्या निमित्ताने हेच वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
उमेदवारीचा शिक्का बसला असला तरी अनिकेत तटकरे यांनी विजय गृहीत धरण्याची चूक करू नये. कारण त्यांच्याविरोधात उभे राहिलेले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे केवळ नाराज नेते नसून स्थानिक पातळीवर प्रभावी राजकीय केंद्रे आहेत. विशेषतः जुईली दळवी यांचा अपक्ष अर्ज अखेरपर्यंत कायम राहिला, तर तो केवळ एक अर्ज राहणार नाही तर तटकरे यांच्या मतांच्या गणितात सुरुंग लावण्याचे प्रभावी राजकीय हत्यार ठरू शकतो. दळवी गट शेवटच्या क्षणापर्यंत दबावाचे राजकारण खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तटकरे हे देखील राजकारणातील नवखे खेळाडू नाहीत. विरोधक मतदान करणार नाहीत किंवा दगा-फटका करतील, हे गृहीत धरूनच त्यांनी पर्यायी मतांची बेगमी आधीपासूनच केली असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सध्या दिसणाऱ्या विरोधामागे किती ताकद आहे आणि तटकरे यांनी पडद्यामागे किती मते सुरक्षित करून ठेवली आहेत, याचा खरा उलगडा मतदानाच्या दिवशीच होणार आहे. रायगडच्या राजकारणात एक गोष्ट मात्र वारंवार सिद्ध झाली आहे. तटकरे हे शेवटची चाल टाकण्यापूर्वी संपूर्ण पट मांडून ठेवतात.
…..

Related Articles

Back to top button