आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; स्कॉर्पिओ दरीत कोसळून साताऱ्यातील आठ जणांचा मृत्यू
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अपघातानंतर रात्रभर बचावकार्य; मृत सर्वजण कोरेगाव तालुक्यातील आसगावचे रहिवासी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कोकणातून साताऱ्याकडे निघालेली स्कॉर्पिओ गाडी शेकडो फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
मृतांमध्ये महेश अनिल पवार (25), आदित्य अशोक साळुंखे (21), रितेश राजेंद्र लोखंडे (25), सुहास जितेंद्र लोखंडे (20), अंश समीर चव्हाण (18), उत्कर्ष आनंद शिंगटे (21), अनिल अभिमन्यू शिंगटे (25) आणि चालक नितीन किसन नायकोंडे (35) यांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. हे सर्वजण कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. विविध विभागांमध्ये समन्वय साधून शोधमोहीम अधिक वेगाने राबवण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटात वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, विविध बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले.
महाबळेश्वर रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, भाटिया रेस्क्यू ग्रुप, सिस्केप तसेच सातारा आणि रायगड जिल्ह्यातील प्रशासनाच्या पथकांनी संयुक्तपणे शोध व बचाव मोहीम राबविली. घाटातील अवघड भौगोलिक परिस्थिती, खोल दरी आणि रात्रीची वेळ यामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघातानंतर वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले आहेत. काही वर्षांपूर्वी प्रवासी बस दरीत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. ताज्या दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.




