ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

आज कल्याण… उद्या कुठे? डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा काळ्या फितीने इशारा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकेवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद आता रायगडात उमटले आहेत. जीव वाचविण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांवरच हल्ले होत असतील, तर सरकारी रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याचा इशारा देत अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक संघटना आणि मार्टच्या डॉक्टरांनी गुरुवारी काळी फीत लावून निषेध व्यक्त केला. रुग्णसेवा सुरू ठेवत हा निषेध नोंदविण्यात आला.
कल्याण-डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. डॉक्टरांच्या मदतीला धावलेल्या परिचारिकेलाही धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत असून, अलिबागमध्येही डॉक्टरांनी काळी फीत बांधून निषेध नोंदविला.
डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी दिवस-रात्र सेवा बजावत असतात. मात्र वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्याची जबाबदारी शासनाची असताना अशा घटना सातत्याने घडत असल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
निषेध आंदोलनादरम्यान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील आणि रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सर्व शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली. प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेश नियंत्रण प्रणाली आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.
कल्याणमधील घटनेतील आरोपी रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉक्टर शिक्षक संघटनेचे जनरल सेक्रेटरी डॉ. करण वाघमारे म्हणाले, “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागमधील सर्व डॉक्टर या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहेत. आम्ही काळी फीत लावून रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. डॉक्टर आणि परिचारिकांवर हात उचलणाऱ्यांना कोणतीही माफी नसावी. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची प्रभावी हमी शासनाने द्यावी.”


Related Articles

Back to top button