ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारला घेरण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा ११ मार्चला विधिमंडळावर धडक मोर्चा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
मुंबई 
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विविध मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा) वतीने बुधवारी (११ मार्च) राज्य विधिमंडळावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा दुपारी १२ वाजता आझाद मैदान येथून सुरू होणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज्याच्या विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांनी दिली.
अनुसूचित जाती-जमातींसाठी अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी १५ टक्के निधी राखून ठेवण्याच्या २१ जून १९७९ च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच अनुसूचित जातींच्या निधीचा इतरत्र वापर होऊ नये यासाठी कायदा करावा, अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.
याशिवाय अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण (फ्रिशिप), शिष्यवृत्ती योजना, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासाठी असलेली ८ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा रद्द करावी, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना प्रभावीपणे राबवाव्यात, शासकीय नोकऱ्यांतील अनुसूचित जाती-जमातींचा अनुशेष भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा तसेच पदोन्नतीतील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून सुरू करावे, अशा मागण्याही करण्यात येणार आहेत.
तसेच कंत्राटी भरतीमध्ये आरक्षण धोरण लागू करणे, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे, अनुसूचित जाती-जमातींच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करून त्यांना क्रिमिलेअर लागू करणे आणि मुंढवा येथील महार वतनी जमीन घोटाळ्यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही मोर्चातून केली जाणार आहे.
यासोबतच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, घरकुल योजनेच्या निधीत वाढ, अतिक्रमित रहिवाशांना जागेचे मालकी पट्टे, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका व कोतवाल यांना शासकीय कर्मचारी दर्जा देणे तसेच सर्व महामंडळे व प्राधिकरणांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्यांचाही या मोर्चात समावेश आहे.
या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष गिरीशबाबू खोब्रागडे करणार असून डॉ. देवेश कांबळे, जीवन बागडे, प्रा. अशोक ढोले, सी. पी. रामटेके, भिमराव चौरे, प्रेम गजभिये, सुरेश दहिकर, अ‍ॅड. दिलीप घरडे, दिगंबर वाकोडे, मनोहर भिडे, नानासाहेब देशमुख, प्रकाश तारु, संजीवकुमार इखारे, बाळासाहेब ढबाले, शत्रुघ्न कांबळे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Related Articles

Back to top button