ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

राज्याचे लक्ष्य १० लाख; रायगडने एकट्याने दिले सव्वादोन लाख लाभार्थी, ‘समाधान शिबिरां’त रायगडचा विक्रम

राज्यातील एकूण उद्दिष्टाच्या तब्बल २२ टक्के लाभार्थी रायगडमधून; प्रशासन-लोकप्रतिनिधी समन्वयाचे ठरले यशस्वी मॉडेल


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग
महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरां’मध्ये रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात वेगळी छाप पाडली आहे. राज्य सरकारने या अभियानातून १० लाख नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवांचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असताना, एकट्या रायगड जिल्ह्यातच सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांना लाभ मिळाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महसूल व वन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विरुपाक्ष मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख उपस्थित होते, तर अभिनेते व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनीही विशेष उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना मंत्री बोर्डीकर यांनी राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक महिला लखपती आणि आत्मनिर्भर व्हावी, हे सरकारचे ध्येय असून महिला व बालविकास विभाग त्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य करत, बळीराजा हा केवळ शेतकरी नसून देशाचा अन्नदाता आहे, असे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना हमीभाव वाढविणे, तसेच तरुणांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, सातबारा उतारा यांसह विविध महसुली कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करून अनेक प्रलंबित महसुली कामांचा एकाच छताखाली तातडीने निपटारा करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून लोकप्रतिनिधी सातत्याने काम करत आहेत. योजना केवळ जाहीर न होता त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी वर्षाचे ३६५ दिवस प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी विविध दाखले आणि शासकीय कामे अल्पावधीत पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्याच्या १० लाख लाभार्थ्यांच्या उद्दिष्टात रायगड जिल्ह्याचा सव्वादोन लाखांचा वाटा हा केवळ आकडा नसून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यातील प्रभावी समन्वयाचे यशस्वी उदाहरण ठरत असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.
…..

Related Articles

Back to top button