ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

2029 चे रणशिंग अलिबागमधून; “आमदारकी शेकापचीच” सतेज पाटील यांचा एल्गार

शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सतेज पाटील यांचा विजयाचा नारा; दीड लाख मतांचे लक्ष्य जाहीर


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
“2029 ची आमदारकी शेकापचीच” असा विश्वास काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी
व्यक्त करत कार्यकर्त्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. मतदार पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग, बूथस्तरावरील संघटन बळकट करणे आणि वैचारिक मतदारांपर्यंत पोहोचणे, हीच आगामी विजयाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी (दि. 7) अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सतेज पाटील म्हणाले, “अलिबागमध्ये यापूर्वी शेकापला सुमारे 90 हजार मते मिळाली होती. आता पुढील विधानसभा निवडणुकीत दीड लाख मतांचे लक्ष्य ठेवून 2029 च्या आमदारकीची मुहूर्तमेढ रायगडमधून रोवायची आहे.” मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या विचारांचे मतदार वगळले जाण्याचा धोका असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सतेज पाटील यांनी त्यांना “महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा” अशी उपाधी दिली. सत्ता नसतानाही जनतेवरील प्रभाव, सरकारला प्रश्नांवर जाब विचारण्याची भूमिका आणि संघर्षातून प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती ही आजच्या राजकारणासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. पुरोगामी विचारांची मशाल त्यांनी अखंड पेटती ठेवली असून, विचारांशी तडजोड न करणारे नेतृत्व म्हणून जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अभिष्टचिंतनाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत, “माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांपेक्षा विचारांशी एकनिष्ठ राहा, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे,” असे सांगितले. सत्ता, पदे आणि राजकीय चढ-उतार आले, तरी गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी कधीही सोडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकांचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले की, पक्षाची ताकद बूथ पातळीपर्यंत वाढविणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवून संघटना अधिक मजबूत करावी. जनतेच्या विश्वासाच्या जोरावर परिवर्तन घडवून आणण्याची तयारी आजपासूनच सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सध्याच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी टक्केवारीच्या राजकारणामुळे विकासकामांचा दर्जा घसरल्याचा आरोप केला. सत्तेच्या मोहाला बळी न पडता विचारांशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना भ्रष्ट व्यवस्थेविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला करमळ्याचे आमदार नारायण पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक, सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, ॲड. राजेंद्र कोरडे यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि राज्यभरातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
……

Related Articles

Back to top button