ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
युवाशक्तीच्या नसानसांत संघर्ष चेतवणाऱ्या महिला शक्तीचा जागर; शेकापच्या ८० व्या पर्वाची ‘फ्रंटलाइन कमांडर’ ठरणार का युवापिढी ?
महिला त्रिशक्तीने गाजवला संपूर्ण वर्धापन दिन; युवकांना दिला व्यवस्थेविरोधातील संघर्षाचा मंत्र, शेकापच्या नव्या पर्वाचा चेहरा ठरल्या चित्रलेखा, मानसी आणि सौम्या

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिनात अनेक ज्येष्ठ नेत्यांची भाषणे झाली, अनेक राजकीय भूमिका मांडल्या गेल्या, आगामी निवडणुकांचे संकेत दिले गेले. पण संपूर्ण अधिवेशनाचा आत्मा जर कोणाच्या भाषणात दिसला असेल, तर तो महिला नेतृत्वाच्या आवाजात. राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडीच्या ॲड. मानसी म्हात्रे आणि युवा नेत्या ॲड. सौम्या कोरडे यांनी केवळ भाषणे केली नाहीत, तर उपस्थित युवकांच्या मनात संघर्षाचा नवा ज्वालामुखी पेटविण्याचा प्रयत्न केला.
या तिन्ही महिला नेत्यांच्या भाषणांमध्ये एक समान धागा स्पष्ट दिसला तो म्हणजे युवक. युवक हा केवळ पक्षाचा कार्यकर्ता नाही; तो परिवर्तनाचा शिल्पकार आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणात युवकांचा वापर केवळ घोषणाबाजी, सोशल मीडिया आणि गर्दी जमविण्यापुरता होत असल्याची टीका अनेकदा झाली. मात्र खालापूरच्या व्यासपीठावरून युवकाला थेट संघर्षाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न झाला.
“अपयशाने खचून न जाता संविधानाच्या चौकटीत राहून संघर्ष केला, तर कोणतीही बलाढ्य सत्ता झुकवता येते. शेकापच्या नव्या पर्वात युवक हा केवळ कार्यकर्ता नसून परिवर्तनाचा नेतृत्वकर्ता असेल, असा स्पष्ट संदेश या अधिवेशनातून देण्यात आला.”
चित्रलेखा पाटील यांनी Gen Z आंदोलनाचा संदर्भ देत युवकांच्या संघटित शक्तीने लोकशाही व्यवस्थेवर कसा परिणाम घडवून आणता येतो, हे अधोरेखित केले. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याच्या भारतीय परंपरेचा उल्लेख केला. त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेतील हिंसक आंदोलनांच्या तुलनेत भारतातील संविधानवादी आंदोलनाचा संदर्भ देत युवकांची भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा मुख्य संदेश स्पष्ट होता. व्यवस्थेला धडा शिकवायचा असेल, तर रस्त्यावर उतरणारी पण संविधानाची मर्यादा न ओलांडणारी युवाशक्तीच सर्वात प्रभावी ठरते.
ॲड. मानसी म्हात्रे यांच्या भाषणात संघर्षाला अधिक धार होती. त्यांनी नेट पेपरफुटी आंदोलन, स्मार्ट मीटर, वाढता आर्थिक ताण आणि सरकारच्या धोरणांवर थेट हल्ला चढवला. त्यांच्या मांडणीत युवक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना एकाच संघर्षरेषेत उभे करण्यात आले. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरून निर्णायक आंदोलन उभारण्याचा इशारा हा त्यांच्या भाषणातील सर्वाधिक ठळक मुद्दा ठरला.
युवा नेत्या ॲड. सौम्या कोरडे यांनी तर युवकांच्या भावविश्वालाच थेट स्पर्श केला. युवकांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, युवक जेव्हा जागा होतो, तेव्हा तो केवळ सत्तेला प्रश्न विचारत नाही; तर व्यवस्थेलाच उत्तरदायी बनवतो. शेकापसारख्या विचारप्रधान पक्षात मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी नव्या पिढीला राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागाची हाक दिली.
शेकापच्या व्यासपीठावर महिला नेतृत्वाची आता केवळ औपचारिक उपस्थिती राहिलेले नाही; तर ते पक्षाच्या राजकीय संदेशाचे केंद्रबिंदू बनत आहे. संघर्ष, विचार, संविधान, युवक आणि जनआंदोलन या पाच सूत्रांना महिला नेतृत्वाने ज्या आक्रमकतेने आणि सातत्याने मांडले, त्यामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणांइतकीच नव्हे, तर काही ठिकाणी त्याहून अधिक चर्चा त्यांच्या भाषणांची झाली. अनेकदा महिला नेत्यांची भाषणे औपचारिकतेपुरती मर्यादित राहतात; मात्र खालापूरमध्ये चित्र वेगळे होते. येथे महिला नेतृत्वाने विचार मांडले, संघर्षाची दिशा ठरवली, युवकांना प्रेरित केले आणि आगामी राजकीय लढ्याची मानसिक तयारी करून दिली.
या अधिवेशनातून आणखी एक संदेश स्पष्टपणे उमटला सत्ता कितीही प्रबळ असली, तरी लोकशाहीत जनतेच्या संघटित आवाजापेक्षा मोठी नसते. व्यासपीठावरील अनेक वक्त्यांनी सरकारवर केंद्रीकरण, दडपशाही आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत युवकांना भीतीच्या वातावरणातून बाहेर पडून संविधानाच्या चौकटीत राहून संघर्ष उभारण्याचे आवाहन केले. त्यांचा सूर स्पष्ट होता की लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नसून नागरिकाचा अधिकार आहे. त्या अधिकाराचे सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे जागृत युवाशक्ती. अन्याय, बेरोजगारी, शेतकरी, वीज, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर शांत बसणारी पिढी नव्हे, तर संघर्षातून परिवर्तन घडवणारी पिढी घडविण्याचा प्रयत्न या अधिवेशनातून झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.
शेकाप ८० व्या वर्षात प्रवेश करत असताना पक्षाचा पुढचा अध्याय केवळ ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवावर लिहिला जाणार नाही; तो युवकांच्या ऊर्जेने आणि महिला नेतृत्वाच्या आक्रमक राजकीय हस्तक्षेपाने लिहिला जाणार आहे. खालापूरच्या व्यासपीठावरून झालेली ही सुरुवात संघटनात्मक पातळीवर किती प्रभावी ठरते, हे काळ ठरवेल; मात्र या अधिवेशनाने शेकापच्या राजकीय पुनरागमनाची पहिली ठिणगी नक्कीच पेटवली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.
…….




