ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“मराठी शाळा वाचवण्यासाठी समाज मैदानात; ‘विश्वमंगल’ची ग्लोबल चळवळ सुरू”


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

आळंदी  |

मराठी शाळा बंद पडण्याच्या संकटात असताना आता समाज आणि उद्योगपती थेट मैदानात उतरल्याचे चित्र आळंदी येथे पाहायला मिळाले. मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षण वाचवण्यासाठी “लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेवर आधारित “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”ची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी शाळांना केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक स्तरावरूनही पाठबळ मिळवून देण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर येथे महापूजनाने झाली. त्यानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी काढत सभागृहात आगमन झाले, ज्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक आणि भक्तिमय वातावरण लाभले. पुढे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फाउंडेशनच्या लोगो आणि वेबसाईटचे अनावरण करण्यात आले आणि मराठी चळवळीला डिजिटल व जागतिक दिशा देण्याचा संदेश देण्यात आला.

प्रास्ताविकात सुभाष बापू देशमुख यांनी मराठी शाळा, उद्योग आणि संस्कृती यांना जोडणारे जागतिक नेटवर्क उभारण्याची भूमिका स्पष्ट केली. मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आता समाज व उद्योगपतींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे परदेशातून उपस्थित राहिलेले संजय वायाळ, डॉ. उदय भोसले आणि आप्पासाहेब कोंढारे यांच्या सहभागामुळे ही चळवळ थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे अधोरेखित झाले.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध भागांतील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या मराठी शाळांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकारवर अवलंबून न राहता समाज स्वतः पुढाकार घेत असल्याचे हे ठोस उदाहरण मानले जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि मराठी माध्यम टिकवणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
याशिवाय पंढरपूर ते आळंदी अशी सायकलवारी करून सामाजिक संदेश देणाऱ्या सायकलवीरांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे या चळवळीला सामाजिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान मिळाले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. “विश्वमंगल मराठी फाउंडेशन”च्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याची ही केवळ सुरुवात असून, पुढील काळात ही एक व्यापक चळवळ बनेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


Related Articles

Back to top button