ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

“देवाच्या नावावर बुवाबाजीचं साम्राज्य… नेत्यांची मस्ती आणि जनतेची बौद्धिक दिवाळखोरी!”


फडशा 
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई 
महाराष्ट्र… संतांची परंपरा की भोंदूंचं साम्राज्य?
ज्या भूमीने विचार दिले, बंड दिलं, समतेची शिकवण दिली. तीच भूमी आज अंधश्रद्धेच्या दलदलीत मान खाली घालून उभी आहे, ही वस्तुस्थिती आहे. एकेकाळी संतांनी माणसाला प्रश्न विचारायला शिकवलं; आजचे तथाकथित “बाबा” प्रश्न विचारणाऱ्यांनाच गुन्हेगार ठरवत आहेत.
हे अध्यात्म नाही हा उघड बाजार आहे.
हे मार्गदर्शन नाही ही मानसिक गुलामी आहे.
श्रद्धेच्या नावाखाली लोकांची भीती विकली जाते, अज्ञानाला खतपाणी घातलं जातं आणि विवेकाला जाणीवपूर्वक गाडलं जातं. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे हे सगळं उघडपणे घडत असतानाही समाज शांत आहे, आणि सत्ताधारी नतमस्तक आहेत.
महाराष्ट्र घसरतोय आणि घसरणीचं कारण बाहेर नाही, तर आपल्या डोक्यात आहे. कारण जिथे विचार मरतो, तिथे भोंदू जन्माला येतात… आणि जिथे भोंदू वाढतात, तिथे समाज गुलाम होतो.
ज्या भूमीने शाहू-फुले-आंबेडकरांसारखे विचारांचे दीपस्तंभ दिले, जिथे तुकाराम-ज्ञानेश्वरांनी भक्तीच्या नावाखाली विवेकाची मशाल पेटवली. तीच भूमी आज भोंदूगिरीच्या बाजारात लिलावाला निघाली आहे का, असा प्रश्न आता सरळ विचारावा लागतो. एकेकाळी इथे संत होते. जे माणसाला उभं करायचे; आज “बाबा” आहेत जे माणसाला गुडघ्यावर आणतात.
आज “संत, बाबा, महाराज, गुरु, माऊली, स्वारी, स्वामी, तपोनिष्ठ, महायोगी, ध्यानयोगी, तपस्वी, योगी, सिद्धपुरुष” ही नावं श्रद्धेची राहिलेली नाहीत, तर काही व्यक्तींसाठी ती ब्रँडिंग म्हणून ठरत आहेत. कोणीही उठतो, दोन गूढ वाक्यं बोलतो, दोन भक्त जमा करतो आणि स्वतःला “बाबा” घोषित करतो. ना ज्ञान, ना साधना….फक्त अभिनय आणि मार्केटिंग. आणि समाज? डोळे बंद करून त्याच्या पायावर लोळण घेतो. हा धर्म नाही तर ही आहे सरळ मानसिक गुलामी.
हे सगळं फक्त एका धर्मापुरतं मर्यादित आहे, असं मानणं हीच सर्वात मोठी चूक आहे. भोंदूगिरीला धर्म नसतो ती प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक समाजात वेगवेगळ्या नावांनी उभी आहे. कोठे “बाबा”, कोठे “मौलाना”, कोठे “पाद्री”, कोठे “गुरु”नावं बदलतात, पण खेळ तोच राहतो. लोकांच्या श्रद्धेचा, भीतीचा आणि अज्ञानाचा फायदा घेत हे तथाकथित सर्वत्र आपली दुकानं थाटून बसले आहेत. म्हणून हा प्रश्न कोणत्याही धर्माचा नाही हा प्रश्न आहे विवेक विरुद्ध अंधश्रद्धेचा. जोपर्यंत समाज “नाव” पाहून नमत राहील, तोपर्यंत कोणताही भोंदू हा कोणत्याही धर्मात निर्भयपणे उभा राहणारच.
श्रद्धेच्या नावाखाली उघड लूट सुरू आहे. अंगठ्या, तावीज, गंडे, गंध, माळा, विभूती “चमत्कार” या सगळ्याच्या नावाखाली चालतोय उघड व्यापार. “नाही केलं तर अनर्थ होईल” या एका वाक्याने लोकांच्या भीतीचा बाजार मांडला जातो आणि कोट्यावधींची उकळपट्टी काढली जाते. मग हेच तथाकथित “बाबा” भक्तांच्या पैशावर साम्राज्य उभं करतात. जमिनी, बंगले, शेती, बागा कोट्यवधींची मालमत्ता यासाठी पैसा येतो कुठून? आणि याचा हिशोब कोण घेणार?
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जनतेचे प्रतिनिधीच या भोंदूंच्या पायावर माथा टेकताना दिसतात. फोटो काढतात, पाय धुतात, स्तुती करतात आणि समाजात एकच संदेश जातो की हे सगळं योग्य आहे. खरं तर हा धर्माचा सन्मान नसून धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या घाणेरड्या धंद्याचं उघड प्रमोशन आहे.
हे तथाकथित बाबा फक्त प्रवचन देत नाहीत; ते वोट बँक चालवतात. हजारो, लाखो भक्त म्हणजे लाखो मतं, आणि त्याबदल्यात मिळतं राजकीय संरक्षण आणि कायद्यापासून सूट. हा सरळ सौदा आहे “बाबा देतो मतं, नेता देतो संरक्षण.” यात धर्म नाही, फक्त व्यवहार आहे.
आज या भोंदूंना माज आलाय कारण त्यांना कायद्याची भीतीच उरलेली नाही. त्यामुळे आता त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे, पैशाचा हिशोब उघड झाला पाहिजे आणि गुन्हे सिद्ध झाले तर त्यांना थेट तुरुंगात टाकलं पाहिजे. “धर्म” हा कायद्यापासून सुटकेचा परवाना नाही.
जे या भोंदूगिरीचा पर्दाफाश करतात, त्यांनाच धमक्या दिल्या जातात, खोटे गुन्हे लावले जातात आणि सामाजिक बहिष्कार टाकला जातो. कारण एकच सत्य बाहेर आलं तर हा सगळा “श्रद्धेचा बाजार” कोसळणार आहे. अशोक खरात याला उघडे पाडण्यामध्ये खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांचा मोठा वाटा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. मात्र त्यांना याची किंमत चुकावी लागली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्यांना धमक्याही मिळाल्या होत्या तक्रार मागे घेण्याबाबतही दबाव टाकण्यात आला होता असे त्यांनी विविध समाज माध्यम आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये सांगितले आहे.
फक्त बाबा दोषी नाहीत; त्यांना देव बनवणारा समाजही तेवढाच जबाबदार आहे. जोपर्यंत लोक प्रश्न विचारत नाहीत, विवेक वापरत नाहीत आणि आंधळेपणाने नमतात, तोपर्यंत हा धंदा थांबणार नाही.
शेवटी प्रश्न एकच उरतो आपण संतांच्या वाटेवर चालतोय की गुलामगिरीच्या? महाराष्ट्राची ओळख “बाबा” या शब्दाने नाही, तर विचार, बंड आणि सत्य यांनी आहे. खरे मार्गदर्शक आजही आहेत, पण त्यांच्या आड लपून भोंदूगिरी करणाऱ्यांना वाचवणं हा गुन्हा आहे.
आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. श्रद्धा ठेवायची, पण विवेकासोबत; नमायचं, पण विचार करून; मानायचं, पण आंधळेपणाने नाही. नाहीतर श्रद्धा विकली जाईल, धर्म बदनाम होईल आणि समाज कायमचा मानसिक आणि शारीरिक गुलाम बनेल.
 गौतम बुद्ध सांगतात…..
“अविज्जायं वसन्तानं दुःखं परमं भवति,
विचारो एव सद्धम्मो;
यो स्वयं विचारेति,
सो एव विमुत्तो भवति.”
“अज्ञानात जगणं हेच सर्वात मोठं दु:ख आहे,
विचार करणं हाच खरा धर्म आहे;
जो स्वतः विचार करतो,
तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो.”
…..

Related Articles

Back to top button