ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा ४०% वाटा; कोकणच्या भातक्रांतीमागे संशोधनाची ताकद”
कर्जत कृषी संशोधन केंद्रातून कृषी दिनी विकासाचा संदेश; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त ४८० वृक्षांची लागवड

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
कर्जत |
आंतरराष्ट्रीय तांदूळ व्यापारात भारताचा जवळपास ४० टक्के वाटा असून, देशाच्या कृषी निर्यातीतून सुमारे २४ टक्के परकीय चलन मिळत आहे. या यशामागे कृषी संशोधनाचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात कृषी दिनानिमित्त करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनामुळे कोकणातील भातशेतीचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा करत संशोधन, उत्पादनवाढ आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिसूत्री संदेश देण्यात आला. महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ४८० वृक्षांची लागवड करून कृषी दिन साजरा करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वाघमोडे यांनी सांगितले की, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व शिफारशींमुळे कोकणातील शेतीचा चेहरामोहरा बदलला असून भात उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ व्यापारात भारताचा वाटा जवळपास ४० टक्के असून, एकूण कृषी निर्यातीतून देशाला साधारण २४ टक्के परकीय चलन मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी हेच आपले दैवत असल्याची भावना जपत नवतंत्रज्ञान स्वीकारून सामाजिक जबाबदारी पार पाडल्यास कै. वसंतराव नाईक यांना अपेक्षित कृषी विकास साध्य होईल, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने वृक्ष लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना, मागासवर्गीय समाजातील नेतृत्वालाही सक्षम संधी मिळाल्यास राज्यकारभारात वेगळा ठसा उमटविता येतो, याचे नाईक हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे सांगितले. ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा संदर्भ देत प्रत्येकाने वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाचाही ध्यास घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. महेंद्र गवई, डॉ. नामदेव म्हसकर, डॉ. मीनाक्षी केळुस्कर, डॉ. जीवन कदम, महेशकुमार रावे तसेच ‘रावे’चे विद्यार्थी ज्ञानेश्वर पाटील आणि अथर्व शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भात पैदास विभाग, उद्यानविद्या विभाग, विश्रामगृह परिसर आणि मॉडेल कृषी विद्या विभागात श्रमदानातून ४८० विविध प्रकारच्या फळझाडे व शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.
…..




