धोक्याचा डोंगर! महाबळेश्वरचा महत्त्वाचा दुवा बंद; आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत सीलबंद

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरला जोडणारा महत्त्वाचा पोलादपूर-आंबेनळी घाट (एसएच-१३९) ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
पोलादपूर घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही समोर आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आणि पोलादपूर तहसीलदार यांनी सादर केलेल्या अहवालात आंबेनळी घाट हा अतिसंवेदनशील आणि दरडप्रवण मार्ग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मार्गावर अतिवृष्टीच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि मानवी जीविताची हानी टाळावी, यासाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती.
यापूर्वी ३ ते ६ जुलै या कालावधीतही सुरक्षिततेच्या कारणास्तव आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने आणि धोका कमी न झाल्याने बंदीचा कालावधी आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.
महाडचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनीही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत आंबेनळी घाट मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर सर्व संबंधित अहवालांचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम आदेश जारी केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांना आंबेनळी घाट मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले असून या कालावधीत उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट केले आहे.





