ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
रायगडमध्ये राजकीय मांडवली झाली ; सत्तेची कवाडे उघडली, पण मनांचे दरवाजे अजूनही कुलूपबंद?

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेनंतर महायुतीचे गणित जुळले असे वरवर दिसत असले तरी मनांचे गणित मात्र अजूनही विस्कटलेलेच आहे, हे आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. कारण सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यात शिवसेना शिंदे गटाला सुरुवातीची अडीच वर्षांची अध्यक्षपदाची मुदत हवी होती. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ते मान्य केले नाही. परिणामी सत्तेत सहभागी व्हावे लागले असले तरी शिंदे गटात प्रचंड नाराजी दाटून आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सत्तेची मांडवली झाली असली तरी मनांची मांडवली अजूनही बाकी आहे, असेच सध्या रायगडच्या राजकारणात दिसून येत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करून घेताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसमोर काही स्पष्ट अटी ठेवल्याचे बोलले जाते. त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे सुरुवातीचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार नाही. स्थानिक पातळीवरील शिवसेना नेत्यांनी ही अट मान्य केल्यानंतरच सत्तेची कवाड उघडली गेली, अशी चर्चा आहे. म्हणजेच सत्तेत सहभागी होण्याच्या बदल्यात शिवसेनेला काही अटी मान्य करत पाऊल मागे घ्यावे लागले, असेच राजकीय समीकरण सूचित करत आहे.
रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या महिनाभरापासून प्रचंड राजकीय घडामोडी घडत होत्या. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सत्ता स्थापनेच्या चर्चांमध्ये शिवसेनेला सातत्याने प्रतीक्षा करावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, शिवसेना शिंदे गट मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी सातत्याने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत होता. अखेर ११ मार्च २०२६ रोजी ऐनवेळी सत्तेची मांडवली करण्यात आली आणि शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या वाटाघाटींमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडल्याचेही बोलले जाते.
मात्र सत्तेत सहभागी करून घेताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्या. त्यामध्ये सुरुवातीचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार नाही, ही अट सर्वाधिक महत्त्वाची मानली जात आहे.
स्थानिक पातळीवरील शिवसेना नेत्यांनी अखेर ही अट मान्य केली आणि त्यानंतरच सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग खुला झाला. परंतु या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरल्याचे दिसून येत आहे. सत्तेत सहभागी झालो असलो तरी अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुरुवातीला बाजूला राहावे लागणार, ही बाब अनेकांना पटलेली नाही. त्यामुळे काही कार्यकर्त्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
काही ठिकाणी तर मंत्री भरत गोगावले यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची चर्चा आहे. “अशा अटी मान्य करून सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात बसणे अधिक योग्य ठरले असते,” असे मत काही कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचेही बोलले जात आहे.
याच नाराजीचे प्रतिबिंब आता सोशल मीडियावर दिसू लागले आहे. “आजचा काळा दिवस”, “शादी में अब्दुल्ला दिवाना” किंवा “लगीन हाय लोकांचं, नाचतय येड्या…” अशा टोमणेखोर पोस्ट व्हायरल होणे ही साधी घटना नाही. राजकारणात अशा पोस्ट अचानक उमटत नाहीत; त्यामागे जाणीवपूर्वक तयार केलेला नाराजीचा सूर असतो. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर चिखलफेक सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
परंतु राजकीयदृष्ट्या पाहता ही भूमिका शिवसेनेसाठीच उलटी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकीकडे महायुतीत राहून सत्ता वाटपात सहभागी व्हायचे आणि दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहयोगी पक्षांवर टोमणे मारायचे, ही दुहेरी भूमिका फार काळ टिकू शकत नाही. महायुतीत सामील झाल्यानंतर सार्वजनिकपणे किंवा अप्रत्यक्षपणे अशा प्रकारे नाराजी व्यक्त करणे हे सहयोगी पक्षांना सहज पचेल, असे मानणे राजकीय भोळेपणाचे ठरेल.
यातून आणखी एक गंभीर प्रश्नही पुढे येतो. जर सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना शिंदे गटाच्या मनासारखा नव्हता, तर त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय का घेतला? आणि सहभागी झाल्यानंतर लगेचच नाराजीचा सूर लावणे हे राजकीय परिपक्वतेचे लक्षण म्हणता येईल का? त्यामुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की सत्ता मिळाली आहे, पण समाधान नाही; सत्तेत आहेत, पण मनाने अजूनही विरोधात असल्यासारखे वर्तन सुरू आहे.
म्हणूनच शेवटी एक सरळ प्रश्न उभा राहतो. शिवसेना शिंदे गटाला खरंच सत्ता मिळाली आहे की सत्तेच्या नावाखाली धतुरा मिळाला आहे? कारण सत्तेत असताना देखील जर कार्यकर्ते “काळा दिवस” म्हणत असतील, तर त्या सत्तेला विजय म्हणायचा की तडजोड, हा निर्णय आता रायगडच्या जनतेनेच घ्यायचा आहे.
….
“पुढील लेखात वाचा : सर्वपक्षीय सत्ता की लोकशाहीचा गळा दाबला? रायगडमध्ये समतोल ढासळला!”




