ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड
स्थानिक कलाकारांचा दमदार अभिनय; ‘तिसरी घंटा’ने अलिबाग रंगभूमी गाजवली

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
येथील पीएनपी नाट्यगृहात सादर झालेल्या ‘तिसरी घंटा’ या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. पूर्णपणे स्थानिक कलाकारांनी साकारलेले हे नाटक व्यावसायिक दर्जाच्या अभिनयाने आणि सादरीकरणाने उठून दिसले.
रहस्यमय कथानकावर आधारित या नाटकात एका लेखकाच्या मनोविश्वातील गुंतागुंत प्रभावीपणे उलगडण्यात आली. लेखक जयेश मेस्त्री यांच्या लेखणीतून साकारलेले संवाद आणि दिग्दर्शक राजन पांचाळ यांच्या दिग्दर्शनामुळे नाटकाला वेगळी उंची मिळाली.
मुख्य भूमिकेत प्रतिक पानकर यांनी प्रभावी छाप पाडली, तर भाग्यश्री गार्डी हिने ‘मनीषा’ ही भूमिका सहजतेने साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली. राजन पांचाळ यांचे ‘सायमंड’ पात्र विशेष लक्षवेधी ठरले. हिमालय चोरगे, सुनील बुरुमकर, प्रमोद पाटील आणि जान्हवी माने यांनी आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
या सर्व स्थानिक कलाकारांनी अभिनयाची उंची राखत आपणही व्यावसायिक रंगभूमीवर तोडीस तोड आहोत, हे ठामपणे सिद्ध केले.
तांत्रिक बाजूसुद्धा स्थानिक टीमने उत्तम साथ दिली. प्रकाशयोजना मिलन पाटील, संगीत अथर्व फाटक, ध्वनी संयोजन विक्रांत वार्डे व वरुण भगत, रंगभूषा हितेश पवार, वेशभूषा रश्मी पांचाळ, तसेच नेपथ्य व सूत्रसंचालन करणाऱ्या टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.
नाटकानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. कवी विजयकुमार म्हात्रे यांनी आपल्या कवितेतून नाटकाची प्रशंसा केली, तर साहित्यिक धनावडे यांनी “हे नाटक व्यावसायिक दर्जाचे असून स्थानिक कलाकारांची ही मोठी कामगिरी आहे,” असे गौरवोद्गार काढले.




