ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

खोतशाहीविरोधी लढ्यानंतर आता ‘कॉर्पोरेट खोतां’विरोधात शेकापचा “लाल हुंकार”; वीज ग्राहकांसाठी ॲड. मानसी म्हात्रे आक्रमक


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
एकेकाळी शेतकरी आणि कष्टकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या खोतशाहीविरोधात शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात संघर्षाचे रणशिंग फुंकले होते. आज काळ बदलला, शोषणाची साधने बदलली आणि त्याविरोधातील लढ्याचे स्वरूपही बदलले आहे. शेकापच्या मते, स्मार्ट मीटर, वाढीव वीज बिले आणि अपारदर्शक आकारणीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय होत असून हा ‘कॉर्पोरेट खोतां’विरोधातील नव्या संघर्षाचा प्रारंभ आहे. या भूमिकेतून महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी चेंढरे येथील महावितरण कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता राजेश भगत यांना नागरिकांच्यावतीने घेराव घालत थेट जाब विचारला.
सात दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही सुरेश घरत यांनी दिला.
वीज ग्राहकांच्या घरांवर त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणे, नकार देणाऱ्यांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या किंवा गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे आणि त्यानंतर अवाजवी वीज बिले पाठविणे, हा लोकशाही नव्हे तर दडपशाहीचा कारभार असल्याचा आरोप ॲड. मानसी म्हात्रे यांनी केला. पूर्वी ८०० ते १००० रुपयांच्या दरम्यान येणारी वीज बिले आता २५०० ते ३००० रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा करत त्यांनी स्थिर आकार, विविध कर आणि अपारदर्शक बिलपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“हा केवळ स्मार्ट मीटरचा प्रश्न नाही. हा सर्वसामान्यांच्या खिशावर चाललेल्या आर्थिक आक्रमणाचा प्रश्न आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता निर्णय लादणारी व्यवस्था लोकशाहीला शोभणारी नाही. वाढीव बिले तातडीने रद्द करून स्मार्ट मीटरची सक्ती थांबवली नाही, तर शेकाप राज्यव्यापी संघर्ष उभारेल,” असा इशारा ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला.
यावेळी शेकापने स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ बंद करणे, ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवलेले मीटर काढून जुने इलेक्ट्रॉनिक मीटर पुन्हा बसविणे, वाढीव वीज बिले रद्द करणे आणि प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटनुसारच पारदर्शक बिल आकारणी करणे, अशा मागण्यांचे निवेदन महावितरणकडे सादर केले.
या आंदोलनाला वैचारिक अधिष्ठान देताना शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी स्वर्गीय नारायण नागू पाटील यांच्या खोतशाहीविरोधी संघर्षाची आठवण करून दिली. “पूर्वी शेतकरी आणि कष्टकऱ्यांना पिळवणाऱ्या खोतशाहीविरोधात लढा उभारला होता. आज सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या कॉर्पोरेट हितसंबंधांविरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे,” असे सांगत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.
या आंदोलनाने स्मार्ट मीटरच्या प्रश्नापलीकडे जात शेकापने राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. वाढत्या वीज बिलांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या मध्यमवर्गीय, नोकरदार, शेतकरी आणि लघुउद्योजकांच्या असंतोषाला संघटित स्वरूप देण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ महावितरणविरोधातील निषेध न राहता, राज्याच्या ऊर्जा धोरणालाच दिलेले थेट आव्हान ठरले.
आंदोलनात तालुका चिटणीस सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, दत्ता ढवळे, प्रमोद घासे, नागेश कुलकर्णी, अनिल चोपडा, जमाल सय्यद, संजना कीर, अनिल पाटील, नरेश गोंधळी यांच्यासह शेकापचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
…………

Related Articles

Back to top button