क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

मोबाईलच्या स्क्रीनमधून मैदानाकडे… रायगडचा पुढचा ऑलिम्पियन कुठे आहे? शोध सुरू!

रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची ९ ऑगस्टला ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा; १४ ते २३ वर्षांतील गावागावच्या लपलेल्या क्रीडा प्रतिभेला मिळणार मोठे व्यासपीठ


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग

आजच्या डिजिटल युगात अनेक मुले आणि तरुणांचा मोठा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर खर्च होत असताना, त्यांना पुन्हा मैदानाशी जोडण्याचा आणि रायगड जिल्ह्यातील लपलेल्या क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने हाती घेतला आहे. “रायगडचा पुढचा ऑलिम्पियन कुठे आहे?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्यावतीने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून, भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रायगडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा शोध घेण्याचे माध्यम ठरणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक गुणवंत खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी ही स्पर्धा मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे.

स्पर्धेत १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील, १८ वर्षांखालील, २० वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील मुलगे व मुली सहभागी होऊ शकतात. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, प्रशिक्षक तसेच खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिल्ह्यातील ॲथलेटिक्स चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

खेळाडूंनी आपली ऑनलाइन प्रवेशिका पुढील लिंकद्वारे भरायची आहे: https://forms.gle/gDKU48wF5fdTatvB6
स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२६ असून, इच्छुक खेळाडूंनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रविण खुटारकर (९७७३५२५७७७), यतिराज पाटील (९९२११७१७००) यांच्याशी संपर्क साधवा.

रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. अशाच नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळावी, त्यांच्यातील गुणवत्ता योग्य वेळी ओळखली जावी आणि भविष्यात देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडावेत, या उद्देशाने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनऐवजी मैदानाची वाट निवडणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूसाठी ही स्पर्धा भविष्यातील यशाची पहिली धाव ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

…….


Related Articles

Back to top button