ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अभियंता नशेत?, अन् जनता अंधारात! पिंपळभाटमध्ये १२ तास वीज गायब; ग्रामस्थांनी MSEDCL कार्यालय गाठून केबल आणत स्वतःच्या सहकार्याने केला वीजपुरवठा सुरळीत


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी तक्रार करायची, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करायचा आणि अखेर वीजपुरवठा सुरू व्हायचा, अशी नेहमीची व्यवस्था आता उलटी झाली आहे. पिंपळभाट गावात तब्बल १२ तास वीज गायब राहिल्यानंतर ग्रामस्थांनीच MSEDCL कार्यालय गाठले, केबलची व्यवस्था केली आणि लाईनमनला सहकार्य करत अखेर रात्री वीजपुरवठा सुरू करून घेतला. या प्रकारामुळे महावितरणच्या स्थानिक कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपळभाट गावातील वीजपुरवठा सकाळी सुमारे ११ वाजता खंडित झाला. बराच वेळ उलटूनही वीज न आल्याने ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेकडे विचारणा सुरू केली. मात्र, समाधानकारक माहिती अथवा तातडीची कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला. संबंधित विद्युत अभियंता मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, विचारणा केल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या आरोपांची अधिकृत पातळीवर चौकशी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, दत्ता ढवळे, जयदीप ढवळे, सुरेंद्र ढवळे, विपुल पाटील तसेच पाटील कुटुंबीय आणि अन्य ग्रामस्थांनी महावितरणच्या अलिबाग कार्यालयात धडक दिली. केवळ तक्रार करून थांबण्याऐवजी ग्रामस्थांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणाऱ्या केबलबाबत पाठपुरावा केला. अखेर ग्रामस्थांनी स्वतः केबल घेऊन येत महावितरणच्या लाईनमनला प्रत्यक्ष सहकार्य केले आणि रात्री वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयात जाऊन पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या काही वेळात वीजपुरवठा सुरू होऊ शकला. मग १२ तासांचा अंधार नेमका का सहन करावा लागला? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बिघाड दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाच्या माध्यमातून तातडीने सेवा पूर्ववत करणे ही महावितरणची जबाबदारी असताना, नागरिकांनाच कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या आणि प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामात सहकार्य करावे लागले, तर महावितरणची यंत्रणा नेमकी करते काय? असा सवाल चेंढरे  ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता ढवळे यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे, वीज बिल वसुलीच्या वेळी महावितरणची यंत्रणा क्षणार्धात सक्रिय होते; मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यावर त्याच तत्परतेचा पत्ता का लागत नाही? असा सवालही या घटनेनंतर चर्चेत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून वेळेवर वीजबिलाची अपेक्षा ठेवणाऱ्या यंत्रणेने सेवा देतानाही तितकीच जबाबदारी आणि तत्परता दाखवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
अभियंता मद्यधुंद असल्याच्या आरोपाची चौकशी होणार का?
संबंधित अभियंता मद्यधुंद अवस्थेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. हा आरोप खरा असल्यास शासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात; आणि आरोप तथ्यहीन असल्यास ते स्पष्ट करण्याची जबाबदारीही महावितरण प्रशासनाची आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
जनतेला अंधारात ठेवणाऱ्या कारभाराचा जाब आता महावितरणला द्यावाच लागणार आहे. पिंपळभाटमधील या प्रकारामुळे केवळ एका गावाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला नसून, ग्रामीण भागातील महावितरणच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे अधिकृत म्हणणे समजू शकलेले नाही.
…..

Related Articles

Back to top button