ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगड जिल्हा परिषद सत्तानाट्याचा शेवट; अध्यक्षपदी भाजपाचे मंगेश वाकडीकर, शिंदे गटालाही सत्तेत स्थान

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
रायगड जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्तेचा तिढा अखेर सुटला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश वाकडीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली असून सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमच्या हाती संबंधित नियुक्तीपत्र लागले आहे.

गेल्या महिनाभरापासून रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मोठी राजकीय घडामोड सुरू होती. विशेषतः शिंदे गटाला सत्तेत सहभागी करून घेऊ नये, अशी भूमिका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जात असल्याचे बोलले जात होते. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता शिंदे गटाला सोबत घेऊनच सत्ता स्थापन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तेत शिंदे गटाचाही सहभाग राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
संभाव्य खातेवाटप
सत्तावाटपाबाबत पुढीलप्रमाणे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य
भाजप : अध्यक्षपद व समाजकल्याण
शिंदे गट : उपाध्यक्षपद, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण
दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या काही नवनिर्वाचित सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः अध्यक्षपदासाठी वैकुंठ पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाला अंतिम मान्यता न दिल्याने ते प्रचंड नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेत आता सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी खातेवाटप आणि नाराज सदस्यांचे समाधान कसे केले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
…..




