‘राज्यघटनेच्या शिल्पकाराची ज्ञानसाधना जिथे घडली, ती सामाजिक न्यायाची प्रयोगशाळा!’- महामानवाच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री शिंदेकडून विनम्र अभिवादन
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक वास्तूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
लंडन |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमध्ये राहून ज्ञानसाधना केली, त्या वास्तूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देत बाबासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. बाबासाहेबांच्या जीवनातील हा कालखंड केवळ त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा नव्हे, तर पुढे भारताच्या सामाजिक परिवर्तनाला दिशा देणाऱ्या विचारांच्या जडणघडणीचा महत्त्वाचा टप्पा होता. त्यामुळे ही वास्तू केवळ स्मारक नसून सामाजिक न्यायाच्या विचारांची जणू ‘प्रयोगशाळा’ असल्याची भावना या भेटीतून अधोरेखित झाली.
१९२१-२२च्या काळात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना डॉ. आंबेडकर याच वास्तूमध्ये वास्तव्यास होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला अभ्यास आणि ज्ञानसाधना अखंड सुरू ठेवली. समाजातील शोषित, पीडित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी भविष्यात उभ्या राहणाऱ्या त्यांच्या संघर्षाला या ज्ञानसाधनेने वैचारिक बळ दिले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा दृष्टिकोन याच व्यापक वैचारिक प्रवासातून अधिक प्रगल्भ होत गेला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या ऐतिहासिक वास्तूची पाहणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू, दुर्मिळ पुस्तके, छायाचित्रे आणि त्यांच्या लेखनाशी संबंधित साहित्याची माहिती घेतली. बाबासाहेबांनी लिहिलेले लेख तसेच त्यांच्या विचारांशी संबंधित साहित्य पाहताना त्यांच्या ज्ञानसाधनेच्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला. वास्तूतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा संदेश आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा आहे. शिक्षण, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा विचार आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी ज्या वास्तूमध्ये राहून अभ्यास केला, त्याच जागेला भेट देताना त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा नव्याने अनुभव आल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

बाबासाहेबांनी ज्ञानाला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनवले. त्यांच्या विचारांमुळे वंचित समाजाला हक्क, समानता आणि स्वाभिमानाची दिशा मिळाली. त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शोषित, पीडित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा या ऐतिहासिक वास्तूच्या भेटीतून मिळाली, असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
लंडनमधील या वास्तूला भेट देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिप्राय पुस्तिकेतही आपल्या भावना नोंदवल्या. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणे आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना अधिक बळ देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश या भेटीतून देण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ तसेच शिंदे यांचे सहकारी उपस्थित होते.
……





