क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या मुलींनी मैदान पेटवलं! पहिल्याच सामन्यात बास क्रिकेट अकॅडमीला ११५ धावांची धूळ चारली

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने आयोजित १९ वर्षांखालील मुलींच्या ५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
क्रीडा प्रतिनिधी 
रायगड : जिल्ह्यात क्रिकेटची रणधुमाळी सुरू झाली आहे… आणि सुरुवातीलाच रायगडच्या मुलींनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली!
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने आयोजित १९ वर्षांखालील मुलींच्या ५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला काल जोरदार सुरुवात झाली. पेण, रसायनी (पाताळगंगा) आणि गव्हाण उलवे या तीन मैदानांवर एकाचवेळी सामने रंगले.
ग्रुप “एच” मध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह सातारा, सिंधुदुर्ग, बास क्रिकेट अकॅडमी (पुणे), ज्युडिशियल क्रिकेट अकॅडमी आणि चंद्रोस क्रिकेट क्लब असे सहा संघ मैदानात उतरले आहेत.
पहिला सामना… पहिलाच दणका!
छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पेण येथे रायगड विरुद्ध बास क्रिकेट अकॅडमी, पुणे असा सामना झाला. रायगडच्या संघाने टॉसपासून शेवटच्या चेंडूपर्यंत वर्चस्व राखत ११५ धावांनी जबरदस्त विजय मिळवला.
फलंदाजीत आत्मविश्वास, फटक्यांत धार!
प्रथम फलंदाजी करत रायगडने ४९ षटकांत ६ गडी गमावत १९८ धावा फलकावर लावल्या. भ्रताती राय – ३६ धावा, स्वरा बामगुडे – ३४ धावा, संस्कृती पालकर – २८ धावा कुटल्या.
गोलंदाजांचा कहर… बासचा डाव कोसळला!
१९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बास क्रिकेट अकॅडमीचा संघ अवघ्या ८३ धावांत गारद झाला. गार्गी साळुंके – ४ बळी, समिधा तांडेल – ४ बळी टिपले. भेदक गोलंदाजीसमोर पुण्याच्या फलंदाजांचे काहीही चालले नाही.
मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ
सामन्याचा शुभारंभ रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, पेण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मालती म्हात्रे आणि पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
रायगडच्या मुलींचा हा विजय केवळ सामना जिंकणारा नाही, तर आत्मविश्वास वाढवणारा आहे!
आता पुढील सामन्यांतही अशाच आक्रमक खेळाची अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.
……

Related Articles

Back to top button