रायगडताज्या बातम्या
समुद्रकिनारी दारूची नशा… अलिबाग पोलिसांनी उतरवली “थेट” अटकेच्या कारवाईनं!

अलिबाग : सुट्टीचा आनंद साजरा करायला आलेल्या जळगावच्या चौघा पर्यटकांनी रविवारी अलिबाग समुद्रकिनारी अक्षरशः धिंगाणा घातल्याने खळबळ उडाली. दारूच्या नशेत बेधुंद होऊन त्यांनी अन्य पर्यटकांना त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. अलिबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या चौघांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील हे चारजण शनिवार-रविवारची सुट्टी घालवण्यासाठी अलिबागला आले होते. मात्र, समुद्रकिनारी फिरताना त्यांनी मद्यप्राशन केलं आणि मग त्यांच्या वर्तनाचा तोल सुटला. त्यांनी केलेल्या असभ्य वर्तनाचा इतर पर्यटकांना त्रास झाला.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चौघांना काबूत आणलं. नशेत चूर असल्यामुळे ते पोलिसांचंही ऐकायला तयार नव्हते. अखेर त्यांना ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं.
या प्रकारामुळे अलिबागच्या पर्यटनस्थळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.