ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

70% गुण मिळाले की गाव निरोगी; उरलेलं आजारपण कोणाच्या खात्यात?” ‘आरोग्यसंपन्नते’चा कागदी खेळ सुरू!

अभियानाचा शुभारंभ आजपासून; गावात अजूनही डॉक्टर, पाणी, स्वच्छतेचे प्रश्न कायम


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  | 

ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा आज (1 एप्रिल) पासून शुभारंभ होत असला, तरी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणारे हे अभियान 31 मार्च 2027पर्यंत राबविण्यात येणार असून, गाव पातळीवर आरोग्य सुधारणा, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, मानसिक आरोग्य यावर भर देण्यात येणार आहे. उपचारांपेक्षा आजार टाळण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.
मात्र, प्रत्यक्षात अनेक ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचा अभाव, औषधांची टंचाई, अपुरा पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नसल्याची वस्तुस्थिती कायम आहे. अशा परिस्थितीत “आरोग्यसंपन्न गाव” ही संकल्पना केवळ कागदोपत्री राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या अभियानांतर्गत गावांचे मूल्यमापन करून 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यासाठी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत. मात्र, या गुणांकन पद्धतीमुळे खऱ्या आरोग्य सुधारण्याऐवजी “गुण मिळविण्याची स्पर्धा” सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सर्व ग्रामपंचायतींना या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज विशेष आरोग्य ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातून ग्रामस्थांचा सहभाग किती मिळतो, हेही या योजनेच्या यशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील मूलभूत समस्या सोडवूनच हे अभियान यशस्वी होणार की केवळ गुणांच्या आकड्यांमध्येच अडकून पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…….


Related Articles

Back to top button