ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

थळमध्ये उभा राहणार खत उत्पादनाचा नवा ‘पॉवरहाऊस’; आरसीएफचा NPK प्रकल्प मार्गावर

सामाजिक उपक्रमांनाही गती, सुमारे 10.50 कोटी रुपये खर्च


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |

देशातील वाढत्या खत मागणीचा विचार करून आरसीएफच्या थळ प्रकल्पात नवीन NPK खत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून तो मार्च 2027 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे देशातील संमिश्र खत उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार असून भारताच्या आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) रायगड जिल्ह्यात औद्योगिक विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत परिसरातील गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत.
आरसीएफकडून आरोग्य सेवा, मोबाईल मेडिकल व्हॅन, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहाय्य, शाळा व सार्वजनिक संस्थांना डिजिटल सुविधा, रस्ते बांधकाम, स्वच्छता मोहिमा आणि सौर ऊर्जा प्रकल्प यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. याशिवाय अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आदिवासी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गरजू व वंचित मुलांना पोषक आहार वितरण, वृद्धाश्रमांना आर्थिक मदत तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.
कंपनीकडून शेतकऱ्यांना रोपे व बियाण्यांचे वितरण तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात येत आहे. या विविध उपक्रमांमुळे परिसरातील सामाजिक विकासाला चालना मिळत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
आरसीएफने 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 7.25 कोटी रुपये सामाजिक उपक्रमांवर खर्च केले आहेत. तसेच 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत सुमारे 10.50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अंतर्गत थळ आणि नवगाव परिसरातील मच्छीमार महिलांना आईस बॉक्सचे वितरण, रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
याशिवाय उर्जा कार्यक्षमतेसाठी आरसीएफकडून विविध Energy Saving Projects राबवले जात असून युरिया आणि अमोनिया प्रकल्पांमधील उर्जा वापर कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेची शाश्वतता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
या औद्योगिक प्रकल्पांमुळे स्थानिक पूरक उद्योगांना चालना मिळून प्रादेशिक आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच देशाच्या कृषी क्षेत्रालाही बळकटी मिळेल, असा विश्वास कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासन, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अलिबाग व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरसीएफ कटिबद्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
…..
NPK म्हणजे खतामधील तीन महत्त्वाचे पोषक घटक — नायट्रोजन (N), फॉस्फरस (P) आणि पोटॅशियम (K) — यांचे संतुलित मिश्रण असलेले संमिश्र खत होय. नायट्रोजन पिकांची वाढ व हिरवळ वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते, फॉस्फरस मुळांची वाढ आणि फुलधारणा सुधारण्यास मदत करते, तर पोटॅशियम पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे NPK खताला शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि संतुलित पोषण देणारे खत मानले जाते.

Related Articles

Back to top button