ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

“आता ठरलंय वार फिरलंय”…. निवडीपूर्वी दोन तास ‘हायव्होल्टेज’ बैठक; रायगडच्या सत्तेचा अंतिम सारीपाट अलिबागमध्ये मांडला जाणार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
अलिबाग  |
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला, पण सत्ता कोणाच्या हातात जाणार याचा अंतिम फैसला अजूनही धूसरच आहे. निवडणुकीपूर्वीची भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस युती सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे दिसत असली, तरी शिंदे गटाचा सत्तेत शिरकाव करण्याचा आटापिटा राजकीय समीकरण अधिकच गुंतागुंतीचे बनवत आहे.
१२ तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्याआधी अलिबागमध्ये सत्तेची ‘मांडवली’ आणि राजकीय खलबते रंगणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात आहे. या सत्तासमीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते थेट अलिबागमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये या नेत्यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, भाजपा आमदार रवींद्र पाटील, प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, माजी आमदार अनिकेत तटकरे. या सर्वांच्या उपस्थितीमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला राज्यस्तरीय राजकीय रंग चढला आहे.
राजकीय हालचालींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे निवडून आलेले सदस्य सध्या जिल्ह्याबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवले असल्याची चर्चा आहे. ११ तारखेला हे सर्व सदस्य अलिबागमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, ३४ सदस्य एकत्र असल्याचा दावा केला जात आहे.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – १६, भाजप – १५, उबाठा – ३ यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य अलिबागमधील हॉटेल रवीकिरण येथे ठेवण्याची तयारी असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे दिग्गज नेते पंचतारांकित हॉटेल ‘ताज’ (रेडिसन ब्ल्यू) मध्ये मुक्कामाला असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या दोन तास आधीच मोठी राजकीय बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्या बैठकीत अंतिम समीकरण ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप विजयी मेळावा घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र या मेळाव्यात शिंदे गट सहभागी होणार का? हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या “राष्ट्रवादी काँग्रेस इज इक्वल टू भाजप” असे स्पष्ट राजकीय समीकरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना शिंदे गटाची साथ कितपत आवश्यक वाटते आणि त्यांना सत्तेत किती जागा दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिंदे गटाकडून सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत कितीही आदळआपट झाली, तरी सध्याच्या घडीला त्याचा फारसा परिणाम होईल, असे चित्र तरी दिसत नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून राज्यातील सत्तेत शिंदे गटाची पकड हळूहळू सैल करण्यासाठीच एखादा “ट्रिगर पॉइंट” तयार करत आहेत का, असा प्रश्नही या घडामोडींमुळे उपस्थित होत आहे. मात्र परिस्थितीची जाणीव शिंदे गटालाही आहे. त्यामुळे त्यांना शांत राहणे हेच फायद्याचे ठरणार आहे. प्रभावी विरोधक म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम केल्यास निश्चितच त्यांची राजकीय किंमत वाढणार आहे.
या सगळ्या राजकीय रामायण-महाभारतामागे एकच मोठा मुद्दा असल्याची चर्चा आहे. तो म्हणजे खासदार सुनील तटकरे यांच्याशी घेतलेला पंगा. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांना उघडपणे आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
परिणामी, तटकरे यांच्या राजकीय ‘शेपटीवर पाय’ ठेवण्याची किंमत आता या नेत्यांना मोजावी लागू शकते, असे संकेत रायगडच्या राजकारणातून मिळत आहेत.
रायगडमध्ये सध्या सुरू असलेला सत्तेचा हा खेळ  फक्त जिल्हा परिषदे पुरता मर्यादित नाही. दिग्गजांची अलिबागमध्ये उपस्थिती, सदस्यांना जिल्ह्याबाहेर ठेवण्याची रणनीती आणि पंचतारांकित हॉटेलमधील राजकीय बैठक हे सगळं पाहिलं तर रायगडमध्ये सत्ता स्थापनेचा निर्णय मतपेटीत नव्हे, तर बंद दरवाज्यांआड ठरणार असल्याचे स्पष्ट होते.

Related Articles

Back to top button