ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“सतरा वर्षे खड्डे, धुळ आणि मृत्यू दिलात… आता टोलच्या नावाने जनतेच्या छाताडावर बसून कातडी सोलणार का?” शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर जोरदार प्रहार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
मुंबई-गोवा महामार्गाच्या नावाखाली गेली १७ वर्षे कोकणवासीयांची क्रूर थट्टा सुरू असून आता अपूर्ण, धोकादायक आणि मृत्यूच्या सापळ्यात बदललेल्या रस्त्यावर टोल वसुली सुरु केली आहे. जनतेच्या छाताडावर बसून सरकारने ही उघड लूट सुरू केली आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केला.
“रस्ता नाही… सुविधा नाहीत… सुरक्षितता नाही… तरी टोल मात्र दादागिरीने वसूल केला जातोय. सरकारला नेमकं जनतेला किती छळायचं आहे?” असा संतप्त सवाल करत चित्रलेखा पाटील यांनी सरकार, प्रशासन आणि ठेकेदारांवर जोरदार तोफ डागली.
मुंबई-गोवा महामार्ग हा आता विकासाचा नव्हे तर भ्रष्टाचार, हलगर्जीपणा आणि निष्क्रिय कारभाराचा जिवंत पुरावा बनला आहे. ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, प्रचंड खड्डे, धुळीचे ढग, तासन्तास वाहतूक कोंडी आणि रोज होणारे भीषण अपघात यामुळे कोकणवासीयांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले आहे. तरीही सरकारला जनतेच्या जीवाशी काही देणंघेणं नसून त्यांना फक्त टोलच्या माध्यमातून पैशांची लूट करायची आहे, असा घणाघात त्यांनी केला.
“हा महामार्ग नसून मृत्यूचा कॉरिडॉर बनला आहे. रोज अपघात होतात, निष्पाप लोक मरत आहेत, रुग्णवाहिका अडकत आहेत, व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे; पण सरकार आणि ठेकेदार एसी कार्यालयात बसून फक्त घोषणा करत आहेत,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
पावसाळा तोंडावर आला असताना परिस्थिती आणखी भीषण होणार असल्याचा इशारा देत त्यांनी म्हटले की, अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा नाही, रस्ते चिखलमय होतात आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. “सरकारला कोकणवासीयांच्या जीवाची किंमत शून्य झाली आहे का?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
“१७ वर्षांत महामार्ग पूर्ण करू शकला नाहीत, पण टोल वसुली सुरू करण्याची घाई मात्र जबरदस्त आहे. काम पूर्ण करण्यापेक्षा खर्च वाढवून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचाच उद्योग सुरू आहे. हा विकास नसून सरकारी आश्रयाने चाललेली उघड लुट आहे,” असा जळजळीत आरोप चित्रलेखा पाटील यांनी केला.
“आता कोकण पेटल्याशिवाय राहणार नाही!”
कोकणवासीयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा थेट इशारा देत चित्रलेखा पाटील म्हणाल्या, “अपूर्ण रस्त्यावर टोल वसूल करणे म्हणजे जनतेच्या छाताडावर पाय ठेवून पैसे उकळण्याचा प्रकार आहे. आता जनता गप्प बसणार नाही. सरकार आणि ठेकेदारांविरोधात तीव्र जनआंदोलन उभं केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करावी, अपघातग्रस्त कुटुंबांना मोठी आर्थिक मदत द्यावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.




