ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

फक्त कुंभमेळा नव्हे, पुढील शंभर वर्षांचा नाशिक घडवतोय”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीर्घकालीन विकासाची ग्वाही

दिव्य मराठी'च्या सिंहस्थ कॉन्क्लेव्हला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई |

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाचा पाया ठरणार आहे. कुंभाच्या निमित्ताने उभारली जाणारी पायाभूत सुविधा, आधुनिक प्रशासन व्यवस्था, स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा आणि हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांमुळे पुढील शंभर वर्षांचा नाशिक घडविण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दिव्य मराठी आयोजित ‘वसा सिंहस्थाचा… वारसा नाशिकचा… गौरव महाराष्ट्राचा’ या सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.

शिंदे म्हणाले की, विकास आणि पर्यावरण यावर अनेक कॉन्क्लेव्ह होतात; मात्र सिंहस्थासारख्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयावर कॉन्क्लेव्ह आयोजित करण्याचे धाडस दिव्य मराठीने केले आहे. ही केवळ पत्रकारिता नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. बातम्यांपुरते मर्यादित न राहता भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक अधिष्ठानाला बळ देणारा हा उपक्रम असल्याने दिव्य मराठीने खऱ्या अर्थाने “दिव्य” कार्य केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी कुंभमेळ्याच्या तयारीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील शिलेदारांचा गौरव करण्यात आला. आगामी सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, आखाडे, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना सिंहस्थाच्या प्राथमिक नियोजनासाठी पहिली बैठक त्यांनी घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आढावा बैठका घेण्यात आल्या. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही संपर्क साधून तेथील नियोजन, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात आला. त्या अनुभवाचा उपयोग नाशिक सिंहस्थ अधिक सक्षम करण्यासाठी केला जात आहे.

ते म्हणाले की, सिंहस्थासाठी केवळ तात्पुरती व्यवस्था न करता स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, स्वतंत्र अधिकारी, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती आणि मंत्री समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कुंभाचे व्यवस्थापन व्यक्तींवर नव्हे, तर सक्षम संस्थात्मक व्यवस्थेवर आधारित असेल.

सिंहस्थासाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देत शिंदे म्हणाले की, सुमारे ३२ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. हा खर्च केवळ कुंभापुरता नसून नाशिकच्या कायमस्वरूपी विकासासाठी होणार आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि इतर पायाभूत प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थाची सुरुवात होईल, तर २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. सुमारे १२ कोटी भाविक सिंहस्थात सहभागी होतील, असा अंदाज असून एवढ्या मोठ्या संख्येतील भाविकांचे व्यवस्थापन हे प्रशासनापुढील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयागराजच्या तुलनेत नाशिकमध्ये उपलब्ध जागा कमी असल्याने नियोजन अधिक आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात कुंभ होत असल्यामुळे मुसळधार पाऊस, पूरस्थिती, वादळ, वाहतूक, गर्दी नियंत्रण, आरोग्य सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण व्यवस्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साधूग्रामासाठी सुमारे १,४५० एकर क्षेत्र विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले असून साधू-संत, आखाडे आणि भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. “दिव्य, भव्य, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ” घडविण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकच्या विकासाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना शिंदे म्हणाले की, ठाणे आणि पुण्याप्रमाणे नाशिकसाठीही युनिफाईड डीसीपीआरच्या तरतुदी लागू केल्या जातील. “बघू, पाहू” अशी भूमिका सरकारची नसून “ऑन द स्पॉट डिसिजन” घेण्याची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

भाषणादरम्यान शिंदे यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचाही आढावा घेतला. २०२२ नंतर राज्यात बंद असलेले सण-उत्सव आणि मंदिरे पुन्हा सुरू करण्यात आली. रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यात आले. अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोसारखे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात आले. उद्योग गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असून डबल इंजिन सरकारमुळे लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली. सिंगल विंडो क्लिअरन्समुळे उद्योगांना गती मिळाली आणि महाराष्ट्राने विकासाचा वेग कायम ठेवला, असे त्यांनी सांगितले.

“आमचा अजेंडा सत्ता किंवा खुर्ची नाही; महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हा आहे,” असे सांगत सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचा विकास पुढील अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

शेवटी त्यांनी दिव्य मराठीचे पुन्हा एकदा अभिनंदन करत, सिंहस्थाच्या यशासाठी समाज, प्रशासन आणि माध्यमांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. “सत्य सांगू बिनधास्त” या दिव्य मराठीच्या भूमिकेचे कौतुक करत अशा विधायक उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला नवी उंची मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, दिव्य मराठीचे संचालक गिरीश अग्रवाल, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. रत्नाकर राऊतकर, कल्कीराम महाराज, जयंत सोनी, अंजन बलोदिया, भाऊ चौधरी यांच्यासह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, साधू-संत, आखाड्यांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…….


Related Articles

Back to top button