ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

‘ग्राउंड पॉलिटिक्स’ विरुद्ध ‘डेटा पॉलिटिक्स’; तटकरे-प्रशांत किशोर वादाच्या आड राष्ट्रवादीत ‘कंट्रोल रूम’ची लढाई?

‘नुसत्या सल्ल्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत’; ‘सर्वेक्षणांवर विश्वास ठेवलेला नाही’ म्हणत तटकरे यांचा अप्रत्यक्ष निशाणा; नेतृत्वाचा निर्णय डेटा घेणार की कार्यकर्ते


फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर यांच्या संभाव्य भूमिकेवरून निर्माण झालेला वाद वरकरणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदाभोवती फिरत असला, तरी त्यामागे पक्षाच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्याचा मोठा प्रश्न दडलेला आहे. राष्ट्रवादीचा राजकीय ‘कंट्रोल रूम’ नेमका कुणाच्या हातात असणार मैदानात काम करणाऱ्या नेत्यांच्या की डेटा, सर्वेक्षण आणि निवडणूक रणनीतीच्या आधारे दिशा ठरविणाऱ्या रणनीतीकारांच्या? तटकरे यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा व्यक्तीगत संघर्षापेक्षा दोन वेगळ्या राजकीय पद्धतींच्या संघर्षासारखा पुढे आल्याचे आपल्याला दिसून येते.
सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतल्याचे सांगितले जाते. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणूक रणनीती यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत किशोर यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा पार्थ पवार यांनी फेटाळून लावली आहे.
या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत थेट नाव न घेता निशाणा साधला. “नुसत्या सल्ल्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत. आम्ही प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे आहोत. माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही सर्वेक्षणावर मी आजवर विश्वास ठेवलेला नाही,” असे सांगत त्यांनी सर्वेक्षण आणि रणनीतीपेक्षा प्रत्यक्ष जनसंपर्क व कार्यकर्त्यांच्या ताकदीला महत्त्व दिले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आपण विजयी होणार नसल्याचे सर्वेक्षण सांगत होते; मात्र ते अंदाज चुकीचे ठरवत आपण निवडून आलो, असेही तटकरे यांनी नमूद केले.
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा तटकरे यांच्या प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीबाबतच्या वक्तव्यातून समोर आला.“प्रशांत किशोर यांची पक्षात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली की नाही, याची मला माहिती नाही. ज्या अर्थी मला माहिती नाही, म्हणजे ती झालेली नाही,” असे ते म्हणाले. किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असली तरी पक्षातील निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीतच घेतले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो जर किशोर अधिकृत सल्लागार नसतील, तर पक्षाच्या नेतृत्वाबाबत त्यांच्या मताला एवढे वजन कुठून मिळाले? आणि ते पक्षाच्या रणनीतीवर काम करत असतील, तर प्रदेशाध्यक्षांनाच त्याची माहिती का नाही?
दरम्यान, मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची कथित सहा तासांची बैठक झाल्याची चर्चा आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद, आगामी निवडणूक रणनीती आणि राज्यातील नेतृत्व याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्य नेतृत्वातील बदलाबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जाते; मात्र या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘डिझाइन बॉक्स’ या कंपनीची मदत घेतल्याचाही संदर्भ दिला. रणनीती आणि संकल्पना बाहेरून मिळू शकतात; मात्र त्या प्रत्यक्ष मतांमध्ये बदलण्यासाठी सर्व नेत्यांना महाराष्ट्रभर फिरावे लागले, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे रणनीती कागदावर तयार होते; निवडणूक मात्र मैदानात लढली जाते, हा त्यांचा संदेश स्पष्ट आहे.
राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकांबाबत यापूर्वीपासून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या संभाव्य भूमिकेने पक्षातील अंतर्गत समीकरणांना नवा आयाम दिला आहे. हा वाद केवळ प्रदेशाध्यक्ष बदलाचा नसून पक्षाची दिशा कोण ठरवणार, हा प्रश्न आहे.
डेटा, सर्वेक्षण आणि व्यावसायिक रणनीतीकारांचा आधार घेऊन आधुनिक निवडणूक व्यवस्थापन करायचे की कार्यकर्ता, संघटन आणि जनतेशी थेट संपर्क यांना केंद्रस्थानी ठेवायचे, हा निर्णय राष्ट्रवादीसमोर आहे. दोन्हींचा समन्वय शक्य असला तरी अंतिम निर्णयाचा अधिकार कुणाकडे असेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणूनच तटकरे यांच्या विधानाने एक मोठा प्रश्न पुढे आणला आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचा ‘कंट्रोल रूम’ नेमका कोणाचा? जनतेच्या नाडीवर राजकारण करणाऱ्यांचा की आकडेवारीच्या स्क्रीनवरून दिशा ठरविणाऱ्यांचा?
तरीही या संघर्षाकडे एकतर्फी पाहणे योग्य ठरणार नाही. प्रशांत किशोर यांनी विविध राज्यांमध्ये निवडणूक रणनीती आखत अनेक राजकीय पक्षांना यश मिळवून दिल्याची उदाहरणे आहेत; तर सुनील तटकरे यांनीही ‘ग्राउंड पॉलिटिक्स’ची ताकद केवळ भाषणातून नव्हे, तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष विजय मिळवत दाखवून दिली आहे. त्यामुळे एका बाजूला डेटा, सर्वेक्षण आणि अचूक निवडणूक रणनीतीचे महत्त्व नाकारता येत नाही, तर दुसऱ्या बाजूला मतदारांशी थेट नाते, कार्यकर्त्यांची फळी आणि जमिनीवरील राजकीय पकड यांचीही जागा कुठलीही रणनीती घेऊ शकत नाही. अखेर निवडणूक जिंकण्यासाठी ‘डेटा’ दिशा दाखवू शकतो आणि ‘ग्राउंड’ मतपेटीपर्यंत घेऊन जाऊ शकतो; राष्ट्रवादीसमोर खरी कसोटी या दोन्हींचा संघर्ष करण्याची नाही, तर त्यांचा समन्वय साधून अंतिम निर्णय कुणाच्या हातात ठेवायचा, याची आहे.
……

Related Articles

Back to top button