ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अलिबागच्या रस्त्यांवर तिरंगा बाईक रॅली ; नवीन तरुण नेतृत्वाने देशभक्तीला दिली नवी ऊर्जा

धर्म, इतिहास, व्यापार आणि समुद्राला जोडणाऱ्या मार्गावरून ‘हर घर तिरंगा’ अभियान रुजवण्यात अलिबाग नगर परिषदेचे यश


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

देशभक्ती ही अलिबागकरांच्या हृदयात कायमच रुजलेली भावना आहे; मात्र त्या भावनेला लोकसहभागाची नवी ताकद देत ती द्विगुणित करण्याचे काम गुरुवारी अलिबाग नगर परिषदेच्या भव्य तिरंगा बाइक रॅलीने केले. नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील नव्या तरुण नगरपरिषद नेतृत्वाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाला केवळ शासकीय उपक्रम न ठेवता तो शहराच्या अस्मिता, इतिहास आणि सामाजिक ऐक्याशी जोडलेला लोकउत्सव बनवण्यात उल्लेखनीय यश मिळवले.

रॅलीने नागरिकांच्या मनातील राष्ट्राभिमानाला नवे सार्वजनिक रूप दिले. प्रत्येक दुचाकीवरील फडकणारा तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नव्हता, तर एकता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या सामूहिक जबाबदारीचे प्रतीक ठरला. शहरातील विविध समाजघटकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याने ‘हर घर तिरंगा’ हा संदेश प्रत्यक्ष लोकचळवळीत रूपांतरित झाल्याचे चित्र अलिबागच्या रस्त्यांवर दिसून आले.

नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करत देशभक्ती ही उत्सवापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या आचरणातही दिसली पाहिजे, असा संदेश दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील नव्या तरुण नगरपरिषद टीमने स्वातंत्र्यदिनाचा उत्सव औपचारिकतेच्या चौकटीबाहेर नेऊन नागरिकांना एकत्र आणणारा आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रभक्तीची जोड देणारा प्रेरणादायी उपक्रम साकारला.

अलिबाग बीचवर रॅलीचा समारोप झाला तेव्हा तिरंग्याने सजलेला समुद्रकिनारा आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण हे एकच सांगत होते. अलिबागमध्ये देशप्रेम आधीपासून होते, परंतु त्या भावनेला नव्या उमेदीने रुजवून द्विगुणित करण्याचे ठोस काम या तिरंगा बाइक रॅलीने यशस्वीपणे केले.

…….

“अलिबागकरांच्या मनात देशभक्तीची ज्योत कायम प्रज्वलित आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून त्या भावनेला अधिक व्यापक लोकसहभाग मिळावा, हा आमचा उद्देश होता. धर्म, इतिहास, व्यापार आणि समुद्रकिनाऱ्याला जोडणाऱ्या या तिरंगा बाइक रॅलीने शहराला एका राष्ट्रध्वजाखाली एकत्र आणत राष्ट्रीय एकता व सामाजिक सलोख्याचा प्रेरणादायी संदेश दिला.”
अक्षया नाईक, नगराध्यक्षा, अलिबाग नगर परिषद
……

“तिरंगा बाइक रॅली ही केवळ स्वातंत्र्यदिनाची मिरवणूक नव्हती, तर अलिबागच्या सामाजिक ऐक्याची आणि नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाची अभिव्यक्ती होती. युवक, महिला आणि प्रत्येक समाजघटकाने उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने ‘हर घर तिरंगा’ हा संदेश खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचला.”
— ऍडव्होकेट मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्षा, अलिबाग नगर परिषद
…….


Related Articles

Back to top button