अक्षया नाईक यांच्या पुढाकारातून ‘हरित अलिबाग’ला नवी पालवी; वैकुंठ स्मशानभूमी मार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड
‘सुंदर, स्वच्छ आणि हिरवेगार अलिबाग’चा संकल्प; नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
शहराचा विकास केवळ रस्ते, दिवे आणि नागरी सुविधांपुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते मंगळवारी एमआरएफ सेंटर ते वैकुंठ स्मशानभूमी मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमातून रस्त्याच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासोबतच भविष्यात या मार्गाला हिरवाईची नवी ओळख मिळणार आहे. नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शहरातील विविध विकासकामांसोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देत ‘हरित आणि सुंदर अलिबाग’ घडविण्याच्या दिशेने नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
एमआरएफ सेंटर ते वैकुंठ स्मशानभूमी हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड झाल्याने परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरणीय समतोल राखण्यासही मदत होणार आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते पर्यावरणीय आव्हान लक्षात घेता शहराच्या विकास आराखड्यात हरित उपक्रमांना स्थान देणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे चित्र आहे.

‘विकासासोबत पर्यावरण’ हा दृष्टिकोन पुढे नेत नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी सुविधांसोबतच स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
वृक्षलागवडीनंतर या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही महत्त्वाची ठरणार असून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे भविष्यातील झाडात रूपांतर झाले तरच या उपक्रमाचा खरा उद्देश साध्य होणार आहे. त्यामुळे अक्षया नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या हरित उपक्रमाकडे आता त्याच्या सातत्यपूर्ण संगोपनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, सभापती प्रशांत नाईक, सभापती अनिल चोपडा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगरसेविका अश्विनी ठोसर, एडवोकेट ऋषिकेश माळी, निवेदिता वाघमारे, आनंद पाटील, जमाल सय्यद, समीर ठाकूर यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……
“अलिबागचा विकास करताना केवळ भौतिक सुविधा निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही, तर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यावरही आमचा भर आहे. आज लावलेले प्रत्येक रोप हे उद्याच्या अलिबागच्या पर्यावरणाची गुंतवणूक आहे. त्यामुळे वृक्षलागवडीसोबतच या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यालाही आम्ही प्राधान्य देणार आहोत.” — अक्षया नाईक, नगराध्यक्षा, अलिबाग नगरपरिषद
…….




