ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
शेकापचा अंत केला, तटकरे यांचाही अध्याय संपवला असता’; दळवींनी फुंकले रणशिंग, रायगडच्या राजकारणात नव्या उघड संघर्षाची नांदी?

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
“शेकापचा राजकीय बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्याचा दावा करणारे आमदार महेंद्र दळवी आता थेट खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय वर्चस्वालाच आव्हान देताना दिसत आहेत. ‘एक पर्व संपवलं, दुसरंही संपवलं असतं’ असा इशारा देत दळवींनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर राजकीय तोफ डागली आहे. विशेष म्हणजे, ‘मी पक्षशिस्तीपुढे झुकलो; पण तटकरे यांच्या वर्चस्वापुढे नाही,’ असा स्पष्ट संदेश देत दळवींनी रायगडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी दिली आहे. त्यामुळे जुईली दळवी यांच्या उमेदवारी माघारीमागे केवळ पक्षशिस्त होती की तटकरे-दळवी संघर्षाचा आणखी एक नवा अंक, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.”
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र दिसून आले. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून थेट आव्हान उभे केले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला आणि उघड संघर्ष टळला.
पण अर्ज मागे घेतल्यानंतर महेंद्र दळवी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दळवींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेकाप आणि सुनील तटकरे या दोघांचाही थेट उल्लेख करत, ते म्हणाले, “माझ्या राजकीय कारकिर्दीत एक पर्व संपवले, दुसरेही संपवले असते,” असे विधान केले. त्यामुळे हा रोख नेमका तटकरे यांच्या राजकीय वर्चस्वाकडे असल्याचे मानले जात आहे.

खरंतर दळवी आणि तटकरे यांच्यातील संघर्ष नवीन नाही. त्याची मुळे जवळपास दशकभर मागे जातात. सप्टेंबर २०१४ मध्ये महेंद्र दळवी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि अध्यक्षपद त्यांच्यापासून दूर गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्याही अध्यक्षपदाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. या घडामोडींमध्ये तटकरे गटाची भूमिका असल्याची भावना दळवी समर्थकांमध्ये आजही कायम खदखदत असल्याचे बोलले जाते.
यानंतर दळवींनी शिवसेनेत प्रवेश केला आणि अलिबाग मतदारसंघात शेकापच्या बालेकिल्ल्याला धक्का देत सलग दोन वेळा विजय मिळवला. दळवी सलग दोन वेळा आमदार झाले. त्यामुळे “शेकापचा अंत केला” हा त्यांचा दावा केवळ राजकीय भाषण नाही, तर त्यांच्या राजकीय प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. आता त्याच धर्तीवर त्यांनी तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याने हा संघर्ष वैयक्तिक पातळीवरून थेट राजकीय वर्चस्वाच्या लढाईत बदलल्याचे दिसत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जुईली दळवी यांची उमेदवारी ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हती, तर एक राजकीय संदेश होता. हा संदेश राष्ट्रवादीला जितका होता, तितकाच तो तटकरे यांनाही होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर माघार घेऊन दळवींनी शिस्त पाळली, पण त्याचवेळी आपल्या नाराजीचे प्रदर्शनही केले.
दुसरीकडे सुनील तटकरे सध्या संयमाची भूमिका घेत असल्याचे दिसते. त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असल्याने कोणताही नवीन वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे दळवींच्या विधानाला तत्काळ उत्तर मिळण्याची शक्यता कमी असली तरी या वक्तव्याची राजकीय नोंद तटकरे गटाने घेतली नसल्याचे मानणे भोळेपणाचे ठरेल.
रायगडच्या राजकारणात आज प्रश्न विधान परिषद निवडणुकीचा नाही. खरा प्रश्न आहे तो नेतृत्वाच्या वर्चस्वाचा. एका बाजूला तटकरे कुटुंबाचा दीर्घकाळापासूनचा प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला आक्रमक शैलीत स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व बुलंद करणारे महेंद्र दळवी. त्यामुळे जुईली दळवी यांची माघार ही संघर्षाची समाप्ती नसून आगामी मोठ्या राजकीय लढाईची केवळ प्रस्तावना असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
जुईली दळवी यांचा अर्ज मागे गेला, पण महेंद्र दळवींनी सोडलेला राजकीय बाण थेट सुनील तटकरे यांच्या दिशेने गेला आहे. निवडणूक संपेल, निकाल लागेल; मात्र रायगडच्या राजकारणात दळवी विरुद्ध तटकरे हा संघर्ष आता आणखी धारदार होणार, अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत.
……




