ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
७९ व्या वर्धापन दिनी शेकापसमोर विरोधकांचे नव्हे; जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्याचे मोठे आव्हान
संघर्षाची नवी चाहूल दिली असली, तरी पुनरुज्जीवनासाठी इतिहासाचा अभिमान पुरेसा नाही, आत्मपरीक्षण, संघटनात्मक पुनर्बांधणी आणि खंबीर नेतृत्वाची गरज

फडशा
आविष्कार देसाई
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
खालापूर तालुक्यात साजरा होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षासमोर आज सर्वात मोठे आव्हान विरोधकांना पराभूत करण्याचे नसून जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे आहे. गेल्या काही दिवसांत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न, स्मार्ट मीटरच्या विरोधातील भूमिका आणि दिल्लीतील जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला दिलेला सक्रिय पाठिंबा यांसारख्या मुद्द्यांवर पक्षाने पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्षाची धार कायम असल्याचा संदेश दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून, शेकापच्या राजकीय संक्रमणाची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र हे राजकीय संक्रमण केवळ आंदोलनांपुरते मर्यादित न राहता संघटनात्मक आणि वैचारिक पुनर्रचनेत रूपांतरित झाले, तरच पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे स्वप्न साकार होऊ शकते.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी उभा राहिलेला शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वैचारिक पर्व आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, शेतकरी-कामगारांचे प्रश्न असोत किंवा ग्रामीण स्वाभिमानाचा लढा असो, शेकापने इतिहास घडवला आहे. मात्र राजकारणात इतिहास हा कायमस्वरूपी परवाना नसतो. प्रत्येक पिढीत स्वतःला नव्याने सिद्ध करावे लागते. शेकापच्या नेतृत्वाने आणि सहनेतृत्वाने ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची वेळ आता आली आहे.
एकेकाळी विधानसभेत १२ ते १५ आमदार, रायगड जिल्हा परिषदेत प्रभावी वर्चस्व, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि सहकार क्षेत्रात मजबूत पकड असलेला पक्ष आज अस्तित्वाच्या लढाईत उभा आहे. विधानसभेत केवळ एक आमदार आणि अलिबाग नगरपरिषदेवरील सत्ता हे सकारात्मक घटक असले, तरी रायगड जिल्हा परिषदेत एकही सदस्य नसणे आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव कमी होणे हा केवळ पराभव नाही; तर जनतेने दिलेला स्पष्ट इशारा आहे.
या परिस्थितीसाठी केवळ विरोधकांना दोष देऊन चालणार नाही. बदलत्या राजकारणाची वेळेत दखल न घेणे, नव्या पिढीला पुरेशी संधी न देणे, संघटन विस्तारातील मरगळ, सोशल मीडिया आणि डिजिटल संवादाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच कार्यकर्त्यांशी कमी झालेला संवाद या सर्व कारणांनी पक्षाचा जनाधार कमकुवत झाला. ज्या पक्षाने जनआंदोलनांच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली, तोच पक्ष काही काळ जनतेच्या मुख्य प्रश्नांवर कमी दिसू लागला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.
तरीही अलीकडच्या काळात दिसलेली आक्रमक भूमिका आशेचा किरण ठरू शकते. रस्त्यांच्या प्रश्नावर आंदोलने, स्मार्ट मीटरविरोधी भूमिका आणि युवकांच्या आंदोलनाशी व्यक्त केलेली एकजूट यामुळे शेकापने पुन्हा संघर्षाची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. ही भूमिका सातत्यपूर्ण जनआंदोलनात रूपांतरित झाली, तर त्यातून पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते.
मात्र एक-दोन आंदोलनांनी जनतेचा विश्वास परत मिळत नाही. गावागावात संघटना उभी राहिली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात नवे नेतृत्व घडले पाहिजे. युवक, महिला, शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी, आणि कामगार यांच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरावे लागेल. संघर्ष हा कार्यक्रमापुरता न राहता पक्षाचा स्वभाव बनला पाहिजे.
पक्षाची खरी ताकद नेते नसतात; तर हजारो निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात. त्यांचा सन्मान केवळ व्यासपीठावरील शाल-श्रीफळात नसतो. त्यांच्या मताला निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाले, त्यांच्या सूचनांचा आदर झाला आणि त्यांच्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष खंबीरपणे उभा राहिला, तरच कार्यकर्ता नव्या जोमाने काम करतो.
ज्या दिवशी पक्षात मतभिन्नतेला स्थान राहत नाही, टीका शत्रुत्व मानली जाते आणि निर्णय काही मोजक्या व्यक्तींपुरते मर्यादित राहतात, त्या दिवसापासून अधोगती सुरू होते. लोकशाहीची भाषा बोलणाऱ्या पक्षात अंतर्गत लोकशाही तितकीच भक्कम असली पाहिजे.
याच बदललेल्या मानसिकतेचे प्रतिबिंब पक्षाच्या काही अलीकडील निर्णयांतही दिसून येते. शेतकरी कामगार पक्षाने अलीकडच्या काळात आपल्या वर्धापन दिनाला इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याची नवी परंपरा सुरू केली आहे. यंदाही विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याची चर्चा आहे. राजकारणात संवाद आणि सभ्यता महत्त्वाची असली, तरी शेकापसारख्या संघर्षशील विचारांच्या पक्षाने स्वतःच्या वर्धापन दिनाचा केंद्रबिंदू स्वतःच्या विचारांऐवजी इतर पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीवर जाऊ द्यावा का, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार रोहित पवार उपस्थित राहण्याची चर्चा आहे.
शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रात आवाज बुलंद निर्माण करणारा पक्ष आहे; दुसऱ्यांच्या बुलंद आवाजाचा आधार घेणारा नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आवाज उठवणाऱ्या, शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांवर सरकाराला हादरे देणाऱ्या पक्षाला आज स्वतःचा वर्धापन दिन गाजवण्यासाठी इतर पक्षांच्या लोकप्रियतेचा आधार घ्यावा लागतो, अशी भावना निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. वर्धापन दिन हा स्वतःच्या विचारांचा, संघर्षाचा, कार्यकर्त्यांचा आणि भविष्यातील दिशेचा उत्सव असतो; तो राजकीय ‘गेस्ट अपिअरन्स’चा कार्यक्रम नसतो. शेकापने इतर पक्षांच्या नेत्यांचा सन्मान जरूर करावा; पण स्वतःच्या विचारांची उंची दाखवण्यासाठी दुसऱ्यांच्या लोकप्रियतेचा आधार घ्यावा लागणार असेल, तर तो आत्मविश्वासाचा नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा विषय आहे.
शेकापची ओळख कधीच पाहुण्यांनी निर्माण केलेली नाही; ती लाखो शेतकरी, कामगार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या संघर्षाने घडवलेली आहे.
जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करायचा असेल, तर पक्षाने आता स्वतःलाच काही कठोर प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. तरुण पिढी पक्षाकडे का वळत नाही? जनआंदोलनात पक्ष सातत्याने अग्रभागी का दिसत नाही? प्रसार माध्यम, डिजिटल माध्यमांमध्ये पक्षाची प्रभावी उपस्थिती का नाही? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधल्याशिवाय पुनरुज्जीवनाचा मार्ग खुला होणार नाही.
७९ वर्षांचा इतिहास हा निश्चितच अभिमानाचा विषय आहे. मात्र इतिहासावर जगणारे पक्ष भविष्यात टिकत नाहीत. इतिहास प्रेरणा देतो; पण भविष्य घडवण्यासाठी नवे विचार, नवे नेतृत्व, नवी ऊर्जा आणि सातत्यपूर्ण संघर्ष आवश्यक असतो.
आज शेकापने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ही योग्य दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे, असे म्हणता येईल. आता या संघर्षाला सातत्य, संघटनेला बळ आणि नेतृत्वाला आत्मपरीक्षणाची जोड मिळाली, तर पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावू शकतो.
७९ वा वर्धापन दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही; तो स्वतःचे प्रतिबिंब आरशात पाहण्याचा दिवस आहे. इतिहासाचा अभिमान राखत भविष्याचा आराखडा तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. संघर्षाची नवी चाहूल जनतेच्या विश्वासात रूपांतरित झाली, तर शेकापचे पुनरुज्जीवन अशक्य नाही. पण बदलाची ही संधीही गमावली, तर इतिहासाच्या गौरवशाली पानांपुरताच पक्ष मर्यादित राहण्याचा धोका नाकारता येणार नाही.
……




