ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

पालकमंत्रीपद गोगावलेंकडे, पण रायगडचा राजकीय पट तटकरेंच्या नव्या चालीने रंगला; महाडमध्ये शक्तिप्रदर्शनाची तयारी!


 

फडशा 
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची बाजी शिवसेनेने मारली असली, तरी जिल्ह्यातील राजकीय प्रभावाची लढाई अद्याप संपलेली नाही. उलट पालकमंत्रीपद हातातून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी रायगडमधील आपला राजकीय प्रभाव अधिक विस्तारण्यासाठी नव्याने राजकीय पट मांडण्यास सुरुवात केली आहे का, असा सवाल महाडमध्ये नवरात्रीनंतर मेळावा घेण्याच्या त्यांच्या घोषणेनंतर उपस्थित झाला आहे.
तटकरे हे राजकारणात एखादी बाजी हातातून गेली की मैदान सोडून देणारे नेते नाहीत; उलट प्रतिकूल परिस्थिती हीच त्यांच्यासाठी पुढचा राजकीय डाव आखण्याची संधी ठरली आहे. संघर्षातून स्वतःचे राजकीय स्थान निर्माण करणाऱ्या तटकरेंसमोर आजवर अनेक मातब्बर राजकीय चेहरे उभे राहिले, मात्र त्यांनी आपल्या राजकीय चातुर्याने आणि संघटनात्मक ताकदीने आपले स्थान टिकवून ठेवले. त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे गेले म्हणून तटकरे रायगडच्या राजकारणातून मागे सरकतील, हा अंदाजच चुकीचा ठरू शकतो. प्रशासकीय ताकद गोगावले यांच्या हातात गेली असली, तरी राजकीय पटावर आपली चाल कोणती असेल, हे ठरवण्याची क्षमता अजूनही तटकरेंकडे आहे. त्यामुळे आता ते बचावाची नव्हे, तर आक्रमणाची भूमिका स्वीकारून राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रात नेण्याच्या तयारीत असल्याचे महाडच्या मेळाव्याच्या घोषणेतून स्पष्ट संकेत मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये नवरात्रीनंतर मेळावा घेण्याची घोषणा विशेष महत्त्वाची ठरते. महाड हा शिवसेनेचे मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांचा राजकीय बालेकिल्ला आहे. त्यामुळे गोगावले पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात विकासकामे आणि संघटनात्मक विस्ताराच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असताना, त्याच प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद दाखवण्याचा तटकरेंचा प्रयत्न हा केवळ मेळावा नसून राजकीय संदेश मानला जात आहे.
पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून शिवसेनेला प्रशासकीय आघाडी मिळाली असली, तरी “प्रशासकीय सत्ता तुमच्याकडे असली तरी राजकीय प्रभावाच्या मैदानात आम्ही मागे हटणार नाही,” असा संदेश तटकरे देऊ पाहत आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
तटकरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थान डळमळीत झाले असून ते स्थिर करण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न असल्याची बोचरी टीकाही दळवींनी केली. हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा दावा करत “रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि भरतशेठ गोगावले पालकमंत्री आहेत. त्यांच्या अशा वल्गनांना आम्ही भीक घालत नाही,” अशा शब्दांत दळवींनी तटकरेंना डिवचले.
दळवी एवढ्यावरच थांबले नाहीत. “कर्जत आणि महाडमध्ये बळ देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यापेक्षा मातब्बर नेते आमच्याकडे आहेत. आम्ही सुरुवात केल्यानंतर हे कुठच्या कुठे जातील,” असा इशाराही दळवींनी दिला.
याचवेळी दळवी आणि तटकरे कुटुंबातील राजकीय संघर्षाला आणखी धार मिळाली आहे. महेंद्र दळवींनी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करताना त्यांना “सरोगसी बाळ” संबोधले. शिवसेनेमुळेच त्यांचा राजकीय जन्म झाला, असा टोला दळवींनी लगावला.
या टीकेला आता अनिकेत तटकरे यांनी तितक्याच आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “महेंद्र दळवींना ‘सरोगसी’ हा शब्द मराठीत किंवा इंग्रजीत लिहिता येत असेल तर त्यांनी तो लिहून दाखवावा. दोन टर्म आमदार असलेल्या व्यक्तीला सरोगसी या शब्दाचा अर्थ माहीत आहे का, हे तरी आम्हाला कळेल,” असा थेट सवाल अनिकेत तटकरेंनी केला.
दळवींनी वापरलेल्या ‘सरोगसी’ या शब्दावरच निशाणा साधत अनिकेत तटकरेंनी दळवींच्या आकलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. “सरोगसी बाळ” या शब्दाचा अर्थ काय, हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे. आमच्याही ज्ञानात भर पडेल,” असा उपरोधिक टोला अनिकेत तटकरेंनी लगावला.
त्यामुळे तटकरे-दळवी संघर्ष आता केवळ पक्षीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही. एका बाजूला महाडच्या मैदानात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा तटकरेंचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दळवींचा दावा, अशी थेट राजकीय प्रतिष्ठेची लढाई आकार घेत आहे.
मात्र या संपूर्ण वादामागे केवळ व्यक्तिगत टीका आहे का, हा खरा प्रश्न आहे. पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली, तर रायगडमधील तटकरेंच्या दीर्घकाळच्या राजकीय प्रभावाला आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला प्रभाव केवळ कायम ठेवायचा नाही, तर तो आणखी विस्तारायचा असल्यास शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रात सक्रिय होणे ही राजकीय रणनीती ठरू शकते.
यामुळेच महाडचा मेळावा महत्त्वाचा ठरतो. गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात तटकरे किती मोठी राजकीय ताकद उभी करतात, यावर पुढील संघर्षाची दिशा ठरू शकते. महाडनंतर रायगडमधील इतर शिवसेना प्रभावक्षेत्रांमध्येही राष्ट्रवादीकडून अशाच प्रकारे राजकीय सक्रियता वाढते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रायगडच्या राजकारणात सध्या एकीकडे पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून शिवसेनेला प्रशासकीय ताकद मिळाली आहे, तर दुसरीकडे तटकरे कुटुंबाकडे दीर्घ राजकीय अनुभव, संघटनात्मक संपर्क आणि जिल्ह्यातील प्रभावाचे मोठे राजकीय भांडवल आहे. त्यामुळे आगामी काळातील संघर्ष “पालकमंत्री कोण?” या प्रश्नापेक्षा “रायगडचा राजकीय प्रभाव कोण वाढवणार?” या प्रश्नाभोवती फिरण्याची शक्यता अधिक आहे.
महाडच्या मेळाव्याची घोषणा ही त्या संघर्षाची केवळ सुरुवात ठरणार की रायगडमध्ये नव्या राजकीय ध्रुवीकरणाचा पाया घालणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
…….

Related Articles

Back to top button