क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अलिबागच्या दहीहंडीला पारंपरिक उत्सवाचा डिजिटल चेहरा; थरांच्या चुरशीसोबत रील्सचीही रंगत

५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता शेतकरी भवनात दहीहंडीचा थरार; ३० पुरुष, २५ महिला गोविंदा पथकांसह ३० रील्स स्पर्धकांची नोंदणी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

पारंपरिक दहीहंडीचा उत्साह आणि सोशल मीडियाच्या नव्या पिढीची क्रेझ यांचा अनोखा संगम यंदा अलिबागमध्ये पाहायला मिळणार आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित ‘दहीहंडी उत्सव २०२६’ला यंदा पारंपरिक उत्सवाचा डिजिटल चेहरा मिळाला असून, गोविंदा पथकांच्या थरांच्या चुरशीसोबत रील्स स्पर्धाही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

या उत्सवातील ‘अलिबागची मानाची दहीहंडी’ या ट्रॉफीचे अनावरण आज शेतकरी भवन, अलिबाग येथे उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्सवाच्या स्पर्धेचे नियम व अटी उपस्थितांना समजावून सांगण्यात आल्या.

वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत असलेल्या या दहीहंडी उत्सवाला अलिबाग तालुक्यातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ३० पुरुष आणि २५ महिला गोविंदा पथकांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे मानाच्या ट्रॉफीसाठी यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, दहीहंडी उत्सवाला सोशल मीडियाशी जोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रील्स स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ३० स्पर्धकांनी नोंदणी केली असून, पारंपरिक दहीहंडीचे क्षण, उत्सवाचा माहोल आणि गोविंदांचा जल्लोष रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोहोचणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

पुरुष गोविंदा पथकासाठी मानाची ट्रॉफी आणि २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महिला गोविंदा पथकासाठी ट्रॉफीसह १ लाख १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय पुरुष पथकाने पाच थरांची सलामी दिल्यास ५ हजार रुपये, तर सहा थरांसाठी ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. महिला पथकासाठी चार थरांच्या सलामीसाठी ५ हजार रुपये आणि पाच थरांसाठी ११ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून शेतकरी भवन, अलिबाग येथे दहीहंडीची स्पर्धा रंगणार आहे. पारंपरिक थरांच्या माध्यमातून ताकद आणि कौशल्याची परीक्षा घेतली जाणार असतानाच रील्स स्पर्धेमुळे उत्सवाचा डिजिटल ठसा सोशल मीडियावर उमटणार आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी केवळ मैदानावरील स्पर्धा न राहता प्रत्यक्ष उत्सव आणि डिजिटल माध्यमांचा संगम ठरणार आहे.

प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडीला आधुनिक आणि स्पर्धात्मक स्वरूप देतानाच युवक, महिला आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुरक्षितता, शिस्त आणि पारंपरिक उत्साह यांचा समन्वय साधत उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगे यांनी केले. यावेळी वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, स्वीकृत नगरसेवक प्रदीप नाईक, सभापती अनिल चोपडा, ॲड. गौतम पाटील, आनंद पाटील, सागर भगत, संतोष गुरव, ॲड. अश्विनी ठोसर, संजना किर, नागेश्वरी हेमाडे, अंजली ठाकूर यांच्यासह आयोजक व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोविंदा पथकांच्या थरांचा थरार, महिला पथकांचा वाढता सहभाग आणि सोशल मीडियावरील रील्सची रंगत यामुळे अलिबागच्या मानाच्या दहीहंडीला यंदा पारंपरिक उत्सवाचा डिजिटल चेहरा मिळाला आहे.


Related Articles

Back to top button