ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सत्ताधारी मशगुल; रुग्णालयाच्या सुरक्षेचे काय? स्लॅब कोसळून रुग्ण जखमी, चित्रलेखा पाटील यांचा आमदार महेंद्र दळवींवर अप्रत्यक्ष निशाणा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
एकीकडे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनात सत्ताधारी मशगुल असल्याचा आरोप, तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळून तो जखमी होण्याची घटना; या विरोधाभासातून शेतकरी कामगार पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.“लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून काहीजण गौतमी पाटीलला नाचवण्यात धन्यता मानतात,” असा टोला लगावत शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धाग्याला पकडत चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी उत्साह दाखवला जात असताना सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले जाते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुनील आवरे यांच्या अंगावर मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी स्लॅबचा काही भाग कोसळून ते जखमी झाले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्याच अंगावर इमारतीचा भाग कोसळण्याच्या या घटनेने रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील पायाभूत सुविधांची अवस्था, इमारतीची देखभाल आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाची पाहणी करत रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या दालनात जाऊन पदाधिकाऱ्यांनी घेराव घालत घटनेबाबत प्रशासनाला जाब विचारला.

यावेळी रुग्णालयातील सुरक्षेच्या उपाययोजना, इमारतीची स्थिती आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोणाची, असा सवाल करत शेकापने प्रशासनाला केवळ दुर्घटनेनंतरची कार्यवाही न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली.
चित्रलेखा पाटील यांनी यावेळी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा संदर्भ घेत सत्ताधाऱ्यांवर राजकीय टीका केली. “जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी कार्यक्रम आणि मनोरंजनाच्या राजकारणाला महत्त्व दिले जात आहे,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कामाच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

रुग्णच्या अंगावर स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी मान्य केली. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा रुग्णालयाच्या इमारतीतील संभाव्य धोके आधीच शोधून दूर करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? असा सवाल शेकापने उपस्थित केला.
रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता तपासावी, धोकादायक भागांची तातडीने दुरुस्ती करावी आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी शेकापने केली आहे. रुग्णांच्या जीविताशी संबंधित प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.
दरम्यान, गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा धागा पकडून जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेचा प्रश्न राजकीय पटलावर आणण्यात शेकापला यश आले असले, तरी या राजकीय टीकेत एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित होता कामा नये. दहीहंडी उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून त्याला सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड असते. याच सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न यांची सरमिसळ करणे कितपत योग्य, हा प्रश्नही उपस्थित होतो.
आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या पुढाकाराने एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित झाला म्हणून त्यांना रुग्णालयाच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी थेट जबाबदार धरणेही तितकेच योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे गौतमी पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला म्हणून त्यांना जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाशी जोडणेही अनाठायी ठरेल. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि रुग्णालयातील स्लॅब दुर्घटना हा प्रशासनाच्या सुरक्षिततेशी संबंधित स्वतंत्र गंभीर विषय आहे.
त्यामुळे आता खरा सवाल गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा नसून, रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता तपासली का गेली नाही, हा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे राजकारण करण्यापेक्षा रुग्णांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नाचे उत्तर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी देणे अधिक गरजेचे आहे.
त्यामुळे आता खरा सवाल गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा नसून, रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता तपासली का गेली नाही, हा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे राजकारण करण्यापेक्षा रुग्णांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नाचे उत्तर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी देणे अधिक गरजेचे आहे.




