ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अलिबागमध्ये ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकासाठी भरत गोगावले सकारात्मक; जागा व निधीसाठी प्रयत्नांचे आश्वासन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

अलिबागमध्ये पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. अलिबाग तालुक्यात स्मारकासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन गोगावले यांनी दिल्याची माहिती पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती संघटनेचे राज्याध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी दिली.

या मागणीसाठी चव्हाण यांनी पालकमंत्री भरत गोगावले यांना निवेदन दिले. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या माध्यमातून निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता पालकमंत्र्यांकडे निवेदन देत स्मारकाच्या मागणीसाठी पुढील पाठपुरावा करण्यात आला आहे.

अलिबाग तालुक्यात शासकीय जागेवर पूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रेरणादायी आणि संस्कारमय स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. स्मारकासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यासोबतच त्याच्या उभारणीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शैलेश चव्हाण यांनी केली.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला विधायक दिशा दिली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अलिबागमध्ये त्यांच्या स्मृतींना समर्पित स्मारक उभारणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले.

स्मारकाच्या मागणीसाठी शैलेश चव्हाण यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या माध्यमातून निवेदन दिले होते. त्यानंतर आता पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी मागणीची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याने स्मारक उभारणीच्या प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अलिबागमध्ये स्मारक उभारणे ही आमची मागणी आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवून जागा उपलब्ध करून देणे आणि निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे,” – शैलेश चव्हाण, अध्यक्ष पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती संघटना 


Related Articles

Back to top button