ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
‘बिग ब्रदर भाजपा’च्या राजकारणावर शिंदे गटाचा पलटवार; महायुतीचा मुखवटा फाटला, 14 महापालिकांत बंडखोरी

महानगरपालिका निवडणुका 2026च्या रणधुमाळीत सत्तेच्या हव्यासाने आंधळे झालेल्या महायुतीचा डाव स्वतःवरच उलटला आहे. जागावाटपाच्या नावाखाली भाजपने दाखवलेली मुजोरी आणि ‘बिग ब्रदर’ मानसिकता शिंदे गटाला सहन न झाल्याने युतीचा बनाव कोसळला असून, तब्बल 14 महानगरपालिकांमध्ये सत्ताधारीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिंदे गटाला गृहीत धरण्याची चूक भाजपाला महागात पडली असून, अनेक ठिकाणी शिंदे गटाने भाजपाला चांगलाच धडा शिकवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. ही केवळ राजकीय फाटाफूट नसून, सत्तेच्या अहंकाराचा हिशेब जनतेसमोर मांडण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट संकेत या निवडणुकीतून मिळत आहेत.
—————————————————
फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
मुंबई : महानगरपालिका निवडणुका 2026 तोंडावर येताच महायुतीतील तथाकथित ‘एकी’चा मुखवटा फाटून बाहेर पडला आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप–शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष आता बंद दाराआड राहिलेला नाही, तर उघडपणे रस्त्यावर आला आहे. जागावाटप, सत्तेची मक्तेदारी आणि अहंकार या मुद्द्यांवरून महायुतीत ठिणगी पडली आणि त्याचे थेट परिणाम 14 महानगरपालिकांमध्ये युती तुटण्याच्या स्वरूपात दिसून आले.

महायुतीत सर्व निर्णय आपणच घेणार, अशी ‘बिग ब्रदर’ मानसिकता भारतीय जनता पार्टीने स्वीकारल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. ज्या ठिकाणी भाजपची संघटनात्मक ताकद अधिक आहे, तिथे शिंदे गटाला दुय्यम वागणूक देण्यात आल्याची चर्चा आहे. जागावाटप करताना ‘घ्या किंवा सोडा’ अशी भाषा वापरली गेली, त्यामुळे ही युती समान भागीदारीची होती की भाजपच्या सत्तालोलुपतेला दिलेली मूक संमती होती, असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजपच्या या दबावाच्या राजकारणाला अखेर शिवसेना (शिंदे गट) ने थेट आव्हान दिले. “आमची ताकद कमी लेखू नका” असा स्पष्ट संदेश देत, अनेक महापालिकांमध्ये युती तोडण्याचा निर्णय घेतला गेला. ज्या ठिकाणी भाजपने शिंदे गटाला गृहीत धरले, त्याच ठिकाणी भाजपलाच धडा शिकवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा निर्णय केवळ युती तुटण्यापुरता मर्यादित नसून, सत्तेतील असमतोलाविरोधात दिलेला इशाराच मानला जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, अकोला, मालेगाव, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 14 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे सत्ताधाऱ्यांचे मत विभाजन होणार असून, विरोधकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. महायुतीने स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्याची भावना आता मतदारांमध्ये पसरताना दिसत आहे.

मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युती जरी कायम ठेवण्यात आली असली, तरी ती विश्वासावर नव्हे तर राजकीय गरजेवर आधारित असल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे या ठिकाणी अजित पवार यांना युतीबाहेर ठेवण्यात आल्याने महायुतीतील अंतर्गत दरी आणखी ठळक झाली आहे. यामुळे ‘आपले’ आणि ‘परके’ अशी विभागणी सत्ताधारी गटातच सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
महानगरपालिका निवडणुका 2026 आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक सत्तेच्या अहंकाराची, मुजोरीची आणि अंतर्गत फाटाफुटीची जनतेकडून होणारी कसोटी ठरणार आहे. भाजपची आक्रमक मुजोरी आणि शिंदे गटाचा थेट पलटवार या संघर्षात मतदार नेमका कुणाला धडा शिकवतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक मात्र निश्चित आहे या निवडणुकीत कुणाचा तरी राजकीय फडशा अटळ आहे.



