ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडवर पावसाचा कहर: ३ मृत्यू, ५ बेपत्ता; २०० हून अधिकांची सुटका, ९३७ जणांचे स्थलांतर


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून विविध दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबवत आतापर्यंत २०० हून अधिक नागरिक आणि पर्यटकांची सुरक्षित सुटका केली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून १४ गावांतील २६५ कुटुंबांमधील ९३७ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ६ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी २३६.६० मिमी पावसाची नोंद झाली. खालापूर तालुक्यात सर्वाधिक ३२३.३ मिमी, महाडमध्ये २७२.२ मिमी आणि सुधागडमध्ये २६८.२ मिमी पाऊस झाला. लोणावळा येथे ६२५ मिमी आणि महाबळेश्वर येथे ४६३ मिमी पावसाची नोंद झाल्याने सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पाताळगंगा नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देत आवश्यक तेथे स्थलांतर सुरू आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २५ ठिकाणी दगड-माती कोसळण्याच्या आणि ७३ घरांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून तीन जण जखमी झाले आहेत. रस्त्यांवरील दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. काही राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य व जिल्हा मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पनवेल, कर्जत आणि महाड तालुक्यांतील धबधबे, नदीपात्र आणि अन्य ठिकाणी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू असून नागरिकांनी धोकादायक पर्यटनस्थळांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामुळे ८४ घरांचे नुकसान झाले असून २४२ घरांमध्ये पाणी शिरले आहे. सात गोठ्यांचे नुकसान झाले असून तीन मोठी जनावरे आणि ८६ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. रोहा तालुक्यातील बाळसई येथील मंदिर, महाड तालुक्यातील विन्हेरे-सुतारकोंड येथील शाळा तसेच १२ खासगी दुकानांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार मदत दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, महावितरण, ‘आपदा मित्र’, स्वयंसेवक आणि ट्रेकर्स यांच्या समन्वयातून बचावकार्य सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अत्यावश्यक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


Related Articles

Back to top button