“महिला आयोगात संवेदनांचा अंत झाला की…” — चाकणकरांनी खुर्ची सोडावी; शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा प्रहार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
“महिला आयोगात संवेदनांचा अंत झाला की त्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही,” असा थेट आणि जहरी प्रहार करत शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. पाटील यांनी चाकणकर यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
नाशिकमधील अशोक खरात (कॅप्टन) अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना या प्रकरणाने आता महिला आयोगालाच कठघऱ्यात उभे केले आहे. गंभीर आरोप असलेल्या अशोक खरात या भोंदूबाबाने स्थापन केलेल्या ‘श्री शिवनिका संस्थान’ या मंदिराच्या विश्वस्त पदावरच चाकणकर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या निष्क्रियतेवर आणि भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चित्रलेखा पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महिलांवरील अत्याचाराच्या इतक्या गंभीर प्रकरणात आयोगाकडून ठोस भूमिका दिसत नाही. उलट आरोपीशी संबंधित संस्थेत पद धारण करणे, हे अत्यंत निषेधार्ह असून महिला आयोगाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारे आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “बलात्काराच्या आरोपाखालील व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे, हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला अजिबात शोभणारे नाही. महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुखाने स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे.”
दरम्यान, या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी आंदोलने आणि सोशल मीडियावर मोहिमा तीव्र होत आहेत. सरकारने या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश अधिक तीव्र होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर जर सरकार आणि महिला आयोगाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेकापकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, महिला सुरक्षेचा मुद्दा पेटला असताना, आता सरकार आणि महिला आयोग कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




