ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“पेणमध्ये शेतीचा डिजिटल टर्न : पारंपरिक पद्धतीतून ‘हायटेक’ शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल”
“भातापासून स्ट्रॉबेरीपर्यंत: पेणमध्ये शेतीला लागली तंत्रज्ञानाची जोड”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पेण |
एकेकाळी केवळ परंपरागत भात शेतीसाठी ओळखला जाणारा पेण तालुका आता बदलाच्या उंबरठ्यावर उभा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘हायटेक’ शेतीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र तालुका स्तरीय भव्य कृषी मेळाव्यात स्पष्टपणे दिसून आले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठशेठ पाटील यांनी केले.
पंचायत समिती पेण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथील आगरी समाज हॉल येथे आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार रविशेठ पाटील होते.
“शेतकरी हा देशाचा कणा असून कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासात अमूलाग्र बदल घडवून आणणार,” असा विश्वास वैकुंठ पाटील व्यक्त केला. “मी स्वतःला शेतकरी समजतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे सभापती म्हणून ठाम उभा आहे. तालुक्यात किमान ५०० नवीन प्रगत शेतकरी तयार करणे ही काळाची गरज आहे,” असे सांगत त्यांनी पशुसंवर्धन खात्याच्या वाढलेल्या बजेटची माहिती दिली तसेच अधिकाऱ्यांना योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी “भात बियाणे व खत नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून बियाणे खरेदी करताना पक्की बिले घ्यावीत. संभाव्य खत टंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाने पुरेसा साठा उपलब्ध ठेवला आहे,” अशी माहिती देत घरगुती बियाण्यांवर प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते यांनी “शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे. स्ट्रॉबेरीसारख्या नव्या पिकांसाठी निधी उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे कोणताही शेतकरी वंचित राहू नये,” असे सांगत कृषी विस्तार यंत्रणेला अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

उपसभापती संजय डंगर यांनी “लहान शेतकऱ्यांसाठी गट शेती हा भविष्यातील पर्याय असून बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांनी नव्या पिढीने शेतीकडे वळण्याची गरजही अधोरेखित केली.
मेळाव्यात कर्जत भात संशोधन केंद्राच्या वतीने नवीन भात जातींचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. सांगवीकर यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात १५ प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, सोलर उपकरणे, ताडपत्री, ब्रश कटर, बॅटरी ऑपरेटेड पंप, फूड प्रोसेसिंग व इतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कृषी सेवक व सहाय्यकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
एकंदरीत, या मेळाव्यातून पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती अधिक सक्षम, नफादायक आणि भविष्याभिमुख करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. आता या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन हा बदल खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




