“नव्या महाराष्ट्राचा रोडमॅप तयार; विकास, विश्वास आणि वेगावर भर” – मेट्रो, समृद्धी महामार्ग, डिजिटल सेवा आणि सर्वसमावेशक योजनांमधून नव्या महाराष्ट्राची दिशा स्पष्ट
ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
ठाणे, १ मे |
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडत, विकास, डिजिटल परिवर्तन, सर्वसमावेशक प्रगती आणि जनतेच्या विश्वासावर आधारित नवा महाराष्ट्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे येथील पोलीस क्रीडा संकुलात भव्य ध्वजवंदन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला.
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , राजश्री शाहू महाराज , ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण करून महाराष्ट्र दिन हा स्वाभिमान, बलिदान आणि जिद्दीचा प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला देशातील पहिली एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले, की राज्य आधीच देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग हब असून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करते. समृद्धी महामार्ग, मेट्रो, कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला वेग मिळत असून पुढील दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्र जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत त्यांनी सांगितले की ३३७ किलोमीटर मेट्रो नेटवर्क, घाटकोपर–ठाणे–मीरा भाईंदर–भिवंडी–कल्याण कनेक्टिव्हिटी, तसेच पॉड टॅक्सी आणि कोस्टल रोड यांसारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. शहराबाहेरील मार्गांमुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही प्रभावी पावले उचलली जात असल्याचे अधोरेखित केले.
प्रशासनात डिजिटल क्रांती घडवत जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असून १०० टक्के डिजिटल कामकाज राबवले जात आहे. १६० ग्रामपंचायती सेवा केंद्रांशी जोडल्या गेल्या असून १००० हून अधिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५५०० पेक्षा अधिक घरपोच सेवा देण्यात आल्या असून “सरकार नागरिकांच्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात आधुनिक शेतीपद्धतींसोबत पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन केले जात असून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग राबवले जात आहेत. पाणलोट क्षेत्र विस्तारासाठी निर्देश देण्यात आले असून जलयुक्त शिवार योजनेला गती देण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेत एचपीव्ही लसीकरण मोहिमेद्वारे मुलींचे संरक्षण केले जात आहे. सुमारे १५०० रुग्णांना घरपोच सेवा देण्यात आली असून लाखो नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १२ डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून “आरोग्यसंपन्न गाव” अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.
शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात विद्यार्थ्यांना इस्रोपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. पिंक रूम उपक्रमामुळे मुलींना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळत असून कौशल्य विकास योजनांमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मिशन लक्ष्मी अंतर्गत क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन देत सुमारे ९०० खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्या लघुउद्योगांच्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावत आहेत, असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी “कामगारांच्या कष्टातून महाराष्ट्र उभा राहिला आहे,” असे नमूद केले.
पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून दरवर्षी १ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिंचनासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचे आवाहनही करण्यात आले.
देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि ऑनलाइन माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
राज्यातील जनतेने महायुती सरकारवर विश्वास दाखवला असून “राजकारण नव्हे, विकास हाच आमचा अजेंडा आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी विकासाचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी एकजुटीने काम करून राज्याला अधिक प्रगत, सक्षम आणि समृद्ध बनवण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी रणजीत यादव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, आमदार संजय केळकर आणि सर्व प्रमुख पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
…..




