क्रीडाताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
महामार्ग कोकणासाठी की कोकणवासीयांच्या खिशासाठी?; अदिती तटकरेंनी टोलच्या पलीकडचा प्रश्न ऐरणीवर आणला
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली नको; कोकणवासीयांच्या हितासाठी अदिती तटकरेंचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ठाम आग्रह

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी काही ठिकाणी अद्याप कामे सुरू आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना वाहनधारकांकडून टोलवसुली सुरू असल्याने हा प्रश्न आता थेट सरकारच्या पातळीवर पोहोचला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, अशी ठाम भूमिका महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतली आहे.
याच मागणीसाठी अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीचा प्रश्न मांडला. या भेटीवेळी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना टोलवसुली होत असल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले.
दरम्यान, या प्रश्नाला स्थानिक पातळीवरही पाठबळ मिळाले असून रायगड जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीच्या विरोधात ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे टोलवसुलीचा प्रश्न केवळ राजकीय मागणी न राहता स्थानिक पातळीवरही चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असताना महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत काम पूर्ण होण्यापूर्वी टोलवसुली करू नये, अशी भूमिका तटकरे यांनी घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरही स्थानिक कोकणवासीय आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विशेष सवलत अथवा स्वतंत्र सवलत योजना लागू करावी, अशी मागणीही तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे ‘काम पूर्ण करा आणि त्यानंतरच टोल घ्या’ यासोबतच ‘स्थानिक नागरिकांना टोलमध्ये दिलासा द्या’ अशी दुहेरी भूमिका त्यांनी घेतली आहे.
महामार्गाच्या अपूर्ण कामांचा प्रश्न, त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी आणि त्याचवेळी सुरू असलेली टोलवसुली या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी हा विषय मुख्यमंत्री स्तरावर मांडला आहे. जिल्हा शांतता समितीचा ठराव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेला थेट आग्रह, यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील टोलवसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.




